मनपाच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र कारभारावर वकिलांचा आक्षेप; निवेदन सादर
परभणी, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागातील कथित अनागोंदी कारभारामुळे नागरिक व अधिवक्त्यांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ जिल्हा वकील संघाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांना बुधवारी(दि. २३
मनपाच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र कारभारावर वकिलांचा आक्षेप; निवेदन सादर


परभणी, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागातील कथित अनागोंदी कारभारामुळे नागरिक व अधिवक्त्यांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ जिल्हा वकील संघाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांना बुधवारी(दि. २३)विविध मागण्यांचे निवेदन वकिल संघाच्या वतीने देण्यात आले.

महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नागरिकांना आवश्यक सेवा मिळण्यासाठी वारंवार मनपा कार्यालयात जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, नोंद दुरुस्ती, उपलब्ध प्रमाणपत्र तसेच इतर विविध सेवांसाठी नागरिकांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी वकील संघाकडे प्राप्त झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, काही प्रकरणांमध्ये संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहिती न मिळणे, अर्जदारांना वारंवार कार्यालयात बोलावले जाणे तसेच कामकाजाबाबत संभ्रम निर्माण होणे यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिवक्ते हे नागरिकांचे कायदेशीर प्रतिनिधी म्हणून मनपा कार्यालयात येत असल्याने त्यांनाही संबंधित विभागाशी वारंवार संपर्क साधावा लागत असल्याचे वकील संघाने निदर्शनास आणून दिले. याशिवाय, जन्म-मृत्यू नोंदणीसंदर्भातील कायदेशीर तरतुदी व जन्म-मुत्यू नोदंणी कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, नागरिकांना नियमांची स्पष्ट माहिती देण्यात यावी आणि तक्रारींचे वेळेत निराकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनावर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. साहेबराव अडकिणे, उपाध्यक्ष अँड. विनोद रसाळ, सचिव अँड. मदन बोबडे, सहसचिव अँड. मृणाल देशमुख, कोषाध्यक्ष अँड. संतोष जाधव यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande