
नांदेड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। किनवट-माहूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाला योग्य भाव मिळावा आणि सीमावर्ती भागातील कापूस आदिलाबाद येथील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) केंद्रावर किमान आधारभूत किंमतीने (एमएसपी) विक्री करता यावा, यासाठी आमदार भीमराव केराम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यंदाच्या हंगामात यश मिळाले आहे. मागील वर्षी आ. केराम यांनी केंद्रीय यंत्रणांकडे दिल्लीपर्यंत पाठपुरावा करून किनवट-माहूर तालुक्यातील कापूस आदिलाबाद येथील सीसीआय केंद्रावर खरेदी करण्याची मागणी केली होती. संबंधित केंद्रीय मंत्री महोदयांनीही पत्राद्वारे ही मागणी मान्य झाल्याची माहिती त्यांना दिली होती. दरम्यान, आगामी खरीप कापूस विपणन हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीसाठी आदिलाबाद जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली असून, जिल्हाधिकारी कार्यालय, आदिलाबाद येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस सीसीआय, कृषी पणन विभाग, बाजार समित्या, जिनिंग मिल मालक, शेतकरी प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे किनवट-माहूर येथील संबंधित अधिकारी व बाजार समितीच्या प्रतिनिधींनाही बैठकीस आमंत्रित करण्यात आले आहे.
या बैठकीत कापूस खरेदीची पूर्वतयारी, एमएसपी खरेदी प्रक्रिया, शेतकऱ्यांची नोंदणी, स्लॉट बुकिंग, वजन काटे, जिनिंग व्यवस्था आणि इतर संबंधित बाबींवर चर्चा होणार आहे. आ. भीमराव केराम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे किनवट-माहूरमधील कापूस कापूस उत्पादकांना आदिलाबाद येथील सीसीआय केंद्राचा लाभ मिळण्याची प्रक्रिया पुढे सरकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कापूस योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि एमएसपी दराने विक्री करता येण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis