परभणी - ताडकळस येथे महावितरणचा ढिसाळ कारभार; मोडलेला विद्युत पोल पाच दिवसांपासून जैसे थे
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। पूर्णा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या ताडकळस येथे महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय येत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशेजारील वर्दळीच्या ठिकाणी विद्युत पोल मोडून पडला आहे. विशेष म्हणजे, हा पोल गणे
अ


परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। पूर्णा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या ताडकळस येथे महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय येत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशेजारील वर्दळीच्या ठिकाणी विद्युत पोल मोडून पडला आहे. विशेष म्हणजे, हा पोल गणेश मंडळाच्या स्टेजजवळ कोसळला असून तो स्टेजवर न पडता बाजूला कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली.

पोल मोडून चार ते पाच दिवस उलटूनही महावितरणकडून तो अद्याप बसविण्यात आलेला नाही. परिणामी परिसरातील विद्युतपुरवठा तीन-चार दिवसांपासून खंडित असून, सणासुदीच्या काळात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी सतत नागरिकांची व वाहनांची वर्दळ असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.

दरम्यान, ताडकळस गावातील अनेक भागांत मोडकळीस आलेले विद्युत खांब तसेच नव्याने टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिन्यांच्या केबल लोंबकळत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत नागरिकांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही आवश्यक कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वीजबिल वसुलीसाठी तत्पर असणारे महावितरणचे अधिकारी-कर्मचारी विद्युत समस्या सोडविण्यासाठी मात्र कधी पुढाकार घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन मोडलेला विद्युत पोल बसवावा, धोकादायक विद्युत वाहिन्या व खांबांची पाहणी करावी आणि खंडित वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी ताडकळस ग्रामस्थांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande