श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रयत्नांतून अनेक विद्यार्थी घडले - डॉ. शरद कुलकर्णी
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रयत्नांतून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळले आणि विविध क्षेत्रांत अभियंते, डॉक्टर यांसारखे व्यावसायिक घडले, असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य व प्रशासकीय अधिकारी
श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रयत्नांतून अनेक विद्यार्थी घडले - डॉ. शरद कुलकर्णी


परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)।

श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रयत्नांतून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळले आणि विविध क्षेत्रांत अभियंते, डॉक्टर यांसारखे व्यावसायिक घडले, असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य व प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले.

श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त नूतन महाविद्यालयात ‘श्रीरामजी भांगडिया यांचे जीवनचरित्र’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी श्रीरामजी भांगडिया यांच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, राजकीय तसेच स्वातंत्र्यलढ्यातील कार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. श्रीरामजी भांगडिया यांनी तांत्रिक शिक्षण, शेतीतील प्रयोग, सुधारित बियाण्यांचा वापर, रेशीम शेती आणि कापूस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले. हादगाव, रवळगाव, मोरेगाव आदी गावांना भेटी देऊन त्यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक जनजागृती घडवून आणली. त्यांच्या प्रयत्नांतून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळले आणि विविध क्षेत्रांत व्यावसायिक घडले, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठीच्या त्यांच्या योगदानाचा उल्लेख करताना, मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, या विचारातून श्रीरामजी भांगडिया यांनी कन्या विद्यालयाची स्थापना केल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याच्या भूमिकेतून त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

1950 नंतर नगरपालिका स्वीकृत सदस्य ते नगराध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. सेलू शहराच्या विकासाला दिशा देताना त्यांनी शहराला वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. 1970 च्या दशकात गावोगावी जाऊन स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली. नगरपालिकेच्या माध्यमातून बालवाड्यांची स्थापना, सर्वोदय नगर परिसरात दलित बांधवांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणे आणि सिमेंटचे पक्के रस्ते बांधणे यांसारखी विविध विकासकामे त्यांनी केली.

श्रीरामजी भांगडिया हे निरपेक्ष वृत्तीने समाजकार्य करणारे, आजीवन अविवाहित राहून ब्रह्मचर्याचे पालन करणारे आणि प्रभावी संघटन कौशल्य असलेले व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक व राजकीय नेतृत्व घडविण्यासह नूतन विद्यालय शिक्षण संस्थेला राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सहभाग हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा अध्याय असल्याचे सांगताना डॉ. कुलकर्णी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या समवेत त्यांनी मुक्तिसंग्रामात घेतलेला सहभाग विशद केला. या लढ्यात त्यांना कारावासही भोगावा लागला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ङ्गदलित मित्रफ पुरस्काराने गौरविल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. उत्तम राठोड यांनी श्रीरामजी भांगडिया यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यापीठ वर्धापन दिन आणि श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. आर. एम. खाडप, कनिष्ठ महाविद्यालयाचे (एचएसव्हीसी) समन्वयक प्रा. ए. टी. मदने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कीर्ती निराळवाड यांनी केले, तर आभार प्रा. मुक्ता सरदेपांडे यांनी मानले. व्याख्यानास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande