
परभणी, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य समुपदेशनाला व्यापक स्वरूप देऊन समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
थॅलेसेमिया प्रतिबंधाबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. नागरिक, विद्यार्थी, गर्भवती महिला तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये थॅलेसेमियाबाबत आवश्यक माहिती पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विवाहपूर्व तपासणी व समुपदेशनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच एचपीएलसी व इलेक्ट्रोफोरेसिस चाचण्यांबाबत जनजागृती करण्यावर त्यांनी भर दिला.
शाळा-महाविद्यालयांमध्ये थॅलेसेमियाविषयी जनजागृतीपर उपक्रम नियमितपणे राबवावेत. तसेच रक्तदान शिबिरांना चालना देऊन गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
थॅलेसेमियाचे वेळेवर निदान, योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास या आजाराचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभागासोबतच शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.
बैठकीस आयुक्त संजय काटकर, आयुक्त (शहरी) डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव राजश्री सारंग, राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगांवकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक चेतन भोजकर उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व मंडळांचे उपसंचालक बैठकीत सहभागी झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis