
* नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर
* दुर्गम भागातील नागरिकांच्या दारात महसुली सेवा
मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.) - सर्वसामान्य व ग्रामीण जनतेला शासकीय सुविधा सहज मिळाव्यात आणि प्रशासकीय कामे जलद गतीने व्हावीत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत नागपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत १ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय आणि १५ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. या निर्णयामुळे स्थानिक शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना साध्या कामांसाठी दूरवरच्या तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात जावे लागणार नाही.
नागपूर जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह ९ अपर तहसीलदार कार्यालये
नागपूर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप विचारात घेऊन नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ९ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू केली जात आहेत.
* नागपूर (ग्रामीण) : बुटीबोरी
* हिंगणा : हुडकेश्वर
* नागपूर (शहर) : वानाडोंगरी
* कामठी : पारडी
* काटोल : वडोदा
* नरखेड : कोंढाळी आणि जलालखेडा
* मौदा : कोदामेंढी
* कुही : वेलतूर
अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागाला मोठा दिलासा
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जनतेला शासकीय सेवा जलद गतीने मिळण्यासाठी जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये ६ नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यात येत आहेत.
* कुरखेडा : मालेवाडा
* आरमोरी : वैरागड
* धानोरा : पेंढरी
* सिरोंचा : आसरअल्ली
* एटापल्ली : कसनसूर
* अहेरी : जिमलगट्टा
या कार्यालयांमुळे नागरिकांना जमिनीचे फेरफार, विविध दाखले, संजय गांधी निराधार योजना आणि इतर महसुली सेवा त्वरित मिळतील. सुरुवातीला ही कार्यालये तात्पुरत्या इमारतींमध्ये सुरू केली जाणार असून, कायमस्वरूपी बांधकामाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर व गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील, ग्रामीण व अतिदुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवांचा लाभ सहज व जलद मिळावा यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. या नवीन कार्यालयांमुळे जनतेचा वेळ आणि प्रवासखर्च वाचेल तसेच प्रशासकीय कामांना मोठी गती मिळेल.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी