यवतमाळमध्ये 9 अधिकाऱ्यांवर ४७ ग्रामपंचायतीचा भार
यवतमाळ, 23 सप्टेंबर (हिं.स.)। सरपंचांना एकाच गावाचा विकास आणि दैनंदिन प्रश्न सांभाळताना कसरत करावी लागते, तिथे एकाच प्रशासकीय अधिकाऱ्याकडे अनेक गावांची धुरा दिल्याने ग्रामीण भागाचा विकास आणि नागरी सुविधांचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त केली जात आह
यवतमाळमध्ये 9 अधिकाऱ्यांवर ४७ ग्रामपंचायतीचा भार


यवतमाळ, 23 सप्टेंबर (हिं.स.)। सरपंचांना एकाच गावाचा विकास आणि दैनंदिन प्रश्न सांभाळताना कसरत करावी लागते, तिथे एकाच प्रशासकीय अधिकाऱ्याकडे अनेक गावांची धुरा दिल्याने ग्रामीण भागाचा विकास आणि नागरी सुविधांचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील मुदत संपलेल्या विविध ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रशासकांची संख्या कमी आणि गावांची संख्या जास्त असल्याने एकाच अधिकाऱ्याकडे तब्बल चार ते आठ गावांचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. तालुक्यात एकूण ७३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी मुदत संपलेल्या ४७ ग्रामपंचायतींचा कार्यभार नऊ विस्तार अधिकाऱ्यांकडे विभागून देण्यात आला आहे. प्रशासकीय सोयीसाठी ही वाटप प्रक्रिया केली असली तरी प्रत्यक्ष कारभार करताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडणार असल्याचे दिसत आहे.

गावात पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छता, दाखले वाटप यांसारख्या रोजच्या कामांसाठी ग्रामस्थांना सरपंचांकडे जावे लागत होते. आता प्रशासक आठवड्यातून एकदा तरी एका गावाला पूर्ण वेळ देऊ शकतील का, असा सवाल उपस्थित होत आहे. एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक गावांचे दप्तर असल्याने शासकीय कामांचा निपटारा वेळेत होणार की कागदपत्रे धूळ खात पडून राहणार, असा प्रश्न आता तालुक्यातील ग्रामस्थांना पडत आहे. तालुक्यातील काही गावांना सध्या पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे तसेच अनेक प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न कोणाकडे मांडावा, असा प्रश्नही ग्रामस्थांना पडत आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande