
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)वशिक्षकांचा स्वाभिमान पैठणी किंवा रोख रकमेच्या किंमतीत विकत घेता येत नाही, असा रोखठोक संदेश देत जलाराम नगर येथील शिवकृपा हायस्कूलच्या शिक्षकांनी राजकीय भेट स्वीकारण्यास नकार दिला. विद्यमान शिक्षक आमदार डॉ. किरण सरनाईक यांच्या माध्यमातून आलेल्या ११ पैठण्या आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारण्याऐवजी शिक्षकांनी ही भेट जेवडनगर येथील ‘सुख-शांती वृद्धाश्रमा’ला सुपूर्द केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार डॉ. किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कौटुंबिक भेट’ म्हणून शिवकृपा हायस्कूलमधील शिक्षकांसाठी पैठण्या व २० हजार रुपयांचे पाकीट दिले होते. यापूर्वी आमदारांच्या निधीतून शाळेला प्रिंटरही देण्यात आला होता. मात्र, शिक्षकांनी सदर भेट स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.भेटवस्तू शाळेतच राहिल्यानंतर शिक्षकांनी सर्वानुमते त्या वृद्धाश्रमातील गरजू महिलांना देण्याचा निर्णय घेतला. तसेच २० हजार रुपयांची रक्कम वृद्धाश्रमाला सुपूर्द करून त्याची रीतसर पावतीही घेण्यात आली. मुख्याध्यापक प्रदीप नानोटे यांनी याबाबत माहिती दिली.यावेळी प्रदीप नानोटे, अर्चना चौधरी, सुनील कापसे, संदीप बाजरे, प्रवीण बैतुले, प्रफुल्ल पवार, शामल सिंदूरकर, सरिता मुरादे, सुभाष बनसोड, राजेश डीगवार, संतोष डवले, गजानन शिंदे व गौतम कांबळे आदी शिक्षक उपस्थित होते.‘पैठणी पॅटर्न’वर शिक्षकांचा संतापशिक्षक हा समाजाला ज्ञान देणारा घटक असून, भेटवस्तू किंवा पैशांचे पाकीट देऊन त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका शिक्षकांनी मांडली. निवडणूक जवळ आली की भेटवस्तूंची आठवण का येते? आमचा स्वाभिमान कोणत्याही भेटवस्तूपेक्षा मोठा आहे, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. २०२०च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही या मतदारसंघात ‘पैठणी पॅटर्न’ची चर्चा झाली होती. आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर शिक्षकांना भेटवस्तू देण्याच्या प्रयत्नावरून या घटनेने शिक्षक मतदारसंघातील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.
प्रलोभनाला बळी पडू नका
आम्ही शिक्षक आहोत, कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही. पैठणी व रोख रक्कम आमच्या शाळेत जबरदस्तीने ठेवण्यात आली. प्रलोभन देऊन शिक्षकांना विकत घेता येत नाही. शिक्षण क्षेत्रातील या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही या वस्तू वृद्धाश्रमाला दान केल्या आहेत. इतर शाळांतील शिक्षकांनीही अशा प्रलोभनांना बळी पडू नये.
अर्चना चौधरीशिक्षिका, शिवकृपा हायस्कूल.------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी