
गर्दी व्यवस्थापनाला युवक-युवतींचा हातभार
यवतमाळ, २३ सप्टेंबर (हिं.स.) : ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी ख्याती असलेल्या बाबापूर येथील गणेशोत्सवाला यंदा सामाजिक सहभागाची नवी जोड मिळाली आहे. गणेश दर्शनासाठी होणारी हजारो भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी शिरपूर पोलिसांनी गावातील सुमारे १०० ते १५० युवक-युवतींना ‘पोलिस मित्र’ म्हणून सहभागी करून घेतले आहे. पोलिसांसोबत स्थानिक युवकांची मिळालेली साथ यामुळे उत्सवातील गर्दी व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होत आहे.
बाबापूर येथील गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून या गणरायाची ख्याती असल्याने दहा दिवसांच्या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यातच दररोज महाप्रसादाचे आयोजन होत असल्याने भाविकांची गर्दी आणखी वाढते. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि गर्दीचे नियोजन हे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान असते.
ही बाब लक्षात घेऊन शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर यांनी यंदा पोलिस मित्रांचा प्रभावी सहभाग निश्चित केला आहे.
गावातील उत्साही युवक-युवतींना पोलिस मित्र म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, भाविकांना रांगेतून दर्शनासाठी मार्गदर्शन करणे, गर्दीचे नियोजन करणे, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सहकार्य करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांना मदत करणे, अशी विविध कामे त्यांच्याकडून केली जात आहेत.पोलिस मित्र ही संकल्पना जुनी असली तरी तिचा प्रभावी वापर सर्वत्र होताना दिसत नाही. मात्र बाबापूरमध्ये पोलिस प्रशासनासोबत स्थानिक युवक-युवतींची ताकद उभी राहिल्याने गर्दी व्यवस्थापनाला मोठी मदत होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनासह नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी