
सोलापूर, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। राज्य सरकारने कोणत्याही अटी-शर्ती न लावता आणि केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता महाराष्ट्रात तातडीने सरसकट दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी केवळ ५ ऑक्टोबरच्या मान्सून अखेरच्या तारखेचा आधार घेणे योग्य नाही. पावसातील सलग खंड, पिकांचे नुकसान आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम यांसह विविध निकषांचा विचार करणे आवश्यक आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
कर्नाटक सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला, तर महाराष्ट्र सरकारला तातडीने निर्णय घेण्यात अडचण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारने परतीच्या पावसाची वाट न पाहता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकार केवळ आश्वासने देत असून शेतकऱ्यांचा अंत पाहत असल्याचा आरोपही खासदार शिंदे यांनी केला. “शेतकरी जगला तरच महाराष्ट्र जगणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड