
* आरोग्य विद्यापीठात ’श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
नाशिक, 23 सप्टेंबर (हिं.स.) - प्रत्येक व्यक्तीने नियमीत आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मा. कुलगुरु प्रा.डॉ. व्यंकट गिते यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यासाठी ’श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ या उपक्रमांतर्गत विद्यापीठात एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ. व्यंकट गिते यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, अधिष्ठाता डॉ. स्वाती जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, वैद्य उदय तळहार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरु प्रा.डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, शासनाने आदेशित केल्यानुसार गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात समाजातील लोकांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. विद्यापीठात आयुर्वेद दिनाचे औचित्य साधत आरोग्य तपासणी शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विविध आरोग्य तपासण्यांसह अग्नीकर्म चिकित्सा पध्दतीचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले. या योजनेचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादीत नसून समाजात आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे असा आहे असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन कामाच्या व्यापात आपण आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. परंतु, निरोगी शरीर आणि प्रसन्न मन हीच खरी संपत्ती आहे. ’श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ या उपक्रमाद्वारे सर्वांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली असून, सर्वांनी नियमित आरोग्य तपासणी करुन आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा.
याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि त्यांचे आरोग्य जपण्याला विद्यापीठाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या युगात उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार वेळेत ओळखणे गरजेचे झाले आहे. अशा आरोग्य तपासणी शिबिरांमुळे संभाव्य धोके आधीच लक्षात येतात आणि त्यावर वेळीच उपचार करणे शक्य होते असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड यांनी सांगितले की, आजच्या या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ई.सी.जी., रक्तशर्करा, हिमोग्लोबिन आणि रक्तदाब यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या चाचण्या मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर गरजेनुसार संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील उपचार, आहार आणि दिनचर्येबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य शिबिरात वैद्य उदय तळहार यांनी अग्निकर्म चिकित्सा संदर्भात विविध आजारांवर करण्यात येणारे उपचार पध्दती व त्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी, डॉ. प्रदीप आवळे, डॉ. मनिषा काळे, डॉ. श्वेता चौधरी, डॉ. गितांजली कार्ले, डॉ. अनुश्री नेटके, श्रीमती मानसी हिरे, डॉ. सागर महाजन, डॉ. आगीवाल व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरात मोठया प्रमाणात रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी