परभणी जिल्ह्यात ‘माहिती अधिकार दिन’ सोमवारी; जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी आणि नागरिकांना त्यांच्या माहितीच्या अधिकाराची प्रभावीपणे जाणीव व्हावी, यासाठी सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात येणार आ
परभणी जिल्ह्यात ‘माहिती अधिकार दिन’ सोमवारी; जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन


परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी आणि नागरिकांना त्यांच्या माहितीच्या अधिकाराची प्रभावीपणे जाणीव व्हावी, यासाठी सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित संस्थांनी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने दि. 28 सप्टेंबर 2008 पासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.

माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित विविध उपक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये प्रश्नमंजूषा, चित्रकला, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे आणि व्याख्यानमाला यांसारख्या उपक्रमांचा समावेश करावा. विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार, त्याचा उद्देश, नागरिकांचे अधिकार आणि शासकीय कामकाजातील पारदर्शकतेचे महत्त्व याबाबत माहिती मिळावी, यासाठी या उपक्रमांचा उपयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

माहिती अधिकार दिनाच्या माध्यमातून नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियमाचा योग्य वापर, त्याअंतर्गत माहिती मिळविण्याची प्रक्रिया तसेच शासकीय कामकाजातील पारदर्शकता व उत्तरदायित्व याबाबत माहिती देण्यावर भर देण्यात येणार आहे.

या उपक्रमांत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना व समाज कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध स्पर्धांतील पारितोषिकांची व्यवस्था लायन्स क्लब, रोटरी क्लब तसेच इतर समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर करण्यात यावी, असे शासन निर्देशात नमूद करण्यात आले आहे.

दि. 8 सप्टेंबर 2026 रोजीच्या निर्देशानुसार यावर्षी सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयातील सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यातील अधिनस्त सर्व कार्यालयांना माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत सूचित करून त्यांच्यामार्फत आवश्यक जनजागृतीपर उपक्रम राबवून घ्यावेत.

सर्व शासकीय कार्यालयांनी शासन निर्णयानुसार माहिती अधिकार दिनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती, केलेली कार्यवाही आणि संबंधित छायाचित्रांसह सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande