सिद्धेश्वर नगर -रमाबाई नगर क्लस्टरचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे, 23 सप्टेंबर, (हिं.स.) : मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचे शा
Siddheshwar Nagar - Ramabai Nagar Cluster Project


ठाणे, 23 सप्टेंबर, (हिं.स.) : मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

ठाण्यातील ६ हजार कुटुंबांना सुरक्षित, दर्जेदार घरे देतानाच २३ नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाऊनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. सुमारे २० हेक्टर अर्थात ५० एकर परिसरात विकसित होणाऱ्या या क्लस्टरमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

निवासी इमारती नव्हे, तर मोठे रस्ते, मुबलक पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, गार्डन, मैदान, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योगा सेंटर, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेतून हा विकास होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनांचा संदर्भ देत शिंदे यांनी क्लस्टरचा प्रवास २० वर्षांच्या संघर्षातून पुढे आल्याचे सांगितले. किसनगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह अनेक दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपोषण, मोर्चे आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवला. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून धोरणात्मक अडथळे दूर करून क्लस्टर प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी नमूद केले. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्लस्टरमध्ये निवासी बांधकामासोबत कमर्शियल विकास आणि स्थानिक रोजगार निर्माण करण्यावर शिंदे यांनी भर दिला. “घरातून उतरायचे आणि जवळच कामाला जायचे,” या ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेतून स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिद्धेश्वर तलाव परिसराचे पुनर्विकासासोबत स्वच्छता व सुशोभीकरण होऊन तलावाला मोकळा श्वास मिळेल, असेही ते म्हणाले.

रहिवाशांच्या मागण्यांबाबत कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत त्यांनी दिले. “दोन पैसे कमी नफा झाला तरी चालेल; नागरिकांच्या घरांच्या दर्जात कपात करू नका,” अशी स्पष्ट सूचना विकासकांना करताना सरकार आणि महापालिकेकडून आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली बोगदा यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचे सांगत, क्लस्टरमधील इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयकॉनिक इमारतींसाठी प्रोत्साहनात्मक एफएसआयची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.

“क्लस्टर म्हणजे केवळ घर नव्हे; चांगले घर, चांगल्या सुविधा, रोजगार आणि बदललेले जीवनमान,” हा संदेश देत शिंदे यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ या ओळींचा दाखला दिला. अखेरीस विकासकांनी नागरिकांना वेळेत घरे देतानाच चांगल्या सुविधांसोबत मोठा टीव्हीही भेट म्हणून द्यावा, अशी मिश्कील सूचनाही त्यांनी केली.

या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. माधव कुसेकर, प्रशांत रोडे, सभागृह नेते हनुमान जगदाळे, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण,शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक नारायण पवार, राम रेपाळे, राजेश मोरे, पवन कदम, संजय वाघुले यांच्यासह ठाण्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande