यवतमाळ : शाळांच्या निविदांना स्थायी समितीचा दणका
यवतमाळ 23 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील शाळांच्या दुरुस्तीच्या कामांच्या निविदांवरून स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाला मोठा धक्का बसला. शाळांच्या छताचे वॉटरप्रूफिंग, कंपाऊंड वॉल, किरकोळ दुरुस्ती तसेच मैदानाच्या सपाटीकरणासह जॉगिंग ट्रॅकच्या कामा
यवतमाळ : शाळांच्या निविदांना स्थायी समितीचा दणका


यवतमाळ 23 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील शाळांच्या दुरुस्तीच्या कामांच्या निविदांवरून स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाला मोठा धक्का बसला. शाळांच्या छताचे वॉटरप्रूफिंग, कंपाऊंड वॉल, किरकोळ दुरुस्ती तसेच मैदानाच्या सपाटीकरणासह जॉगिंग ट्रॅकच्या कामांसाठी मांडण्यात आलेल्या निविदा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावले. संबंधित कामांसाठी फेरनिविदा काढण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थायी समितीची सभा झाली. स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल १५० विषय विषयपत्रिकेवर होते. त्यामध्ये गेडाम नगरातील संजय गांधी शाळा क्रमांक १८, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक एक आणि शाळा क्रमांक १४ यांच्या छताचे वॉटरप्रूफिंग व किरकोळ दुरुस्तीची कामे, तसेच शाळा क्रमांक चार व नऊ येथील कंपाऊंड वॉल आणि किरकोळ दुरुस्तीच्या कामांचा समावेश होता. याशिवाय गांधी नगरातील शाळेच्या मैदानाचे सपाटीकरण करून जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा प्रस्तावही विषयपत्रिकेवर होता. मात्र, शिक्षण विभागाकडून सादर करण्यात आलेल्या या कामांच्या निविदांना मंजुरी देण्याऐवजी स्थायी समितीने सर्व प्रस्ताव नामंजूर केले.

फेरनिविदा काढल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामे कधी सुरू होणार, याकडे आता पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. बैठकीला उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, विषय समिती सभापती लता ठोंबरे, प्रियंका भवरे, रिता धावतोडे, शोभा साबळे, नीता केळापूरे, समिती सदस्य विशाल पावडे, साधना काळे उपस्थित होते. समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षण विभागातील प्रस्तावांच्या निविदा प्रक्रियेवर आता नव्याने लक्ष केंद्रित झाले आहे.

शिक्षण विभागाचे प्रस्तावच चर्चेत

स्थायी समितीसमोर विविध विभागांशी संबंधित १५० विषय ठेवण्यात आले होते. मात्र, शाळांच्या दुरुस्तीच्या कामांशी संबंधित प्रस्तावांवर निर्णय घेताना समितीने फेरनिविदेचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे संबंधित कामे पुन्हा निविदा प्रक्रियेतून जावी लागणार आहेत.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande