खरेदीच्या जोरावर शेअर बाजार तेजीत बंद; सेन्सेक्स २९९ अंकांनी वधारला
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर (हिं.स.)। धातू आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सना मिळालेली मागणी तसेच व्यापक बाजारपेठेत झालेल्या जोरदार खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजार बुधवारी तेजीसह बंद झाला. व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच बाजारात सकारात्मक वातावरण होते. पहिल
Stock Market Closing


नवी दिल्ली, 23 सप्टेंबर (हिं.स.)। धातू आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सना मिळालेली मागणी तसेच व्यापक बाजारपेठेत झालेल्या जोरदार खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजार बुधवारी तेजीसह बंद झाला. व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच बाजारात सकारात्मक वातावरण होते. पहिल्या तासात किरकोळ चढ-उतार झाल्यानंतर खरेदीचा जोर वाढला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी दिवसभरात चांगली कामगिरी केली. मात्र, दुपारनंतर काही प्रमाणात नफावसुली झाल्याने बाजारातील तेजी काहीशी कमी झाली. अखेर सेन्सेक्स २९९.१७ अंक अर्थात ०.४० टक्क्यांच्या वाढीसह ७४,८२८.२५ अंकांवर, तर निफ्टी ११७.८० अंक अर्थात ०.५० टक्क्यांच्या वाढीसह २३,४४६.८० अंकांवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११९.२४ अंकांच्या वाढीसह ७४ हजार ६४८.३२ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात खरेदी-विक्रीच्या दबावामुळे निर्देशांकात चढ-उतार सुरू होते. विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स ७४ हजार ५९९.८८ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने बाजाराला चांगली चालना मिळाली. दुपारी अडीचच्या सुमारास सेन्सेक्स ४४४.६६ अंकांच्या वाढीसह ७४,९७३.७४ अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर नफावसुली झाल्याने काहीशी घसरण झाली आणि अखेर तो २९९.१७ अंकांच्या वाढीसह बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३.१५ अंकांच्या वाढीसह २३,३५२.१५ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारानंतर खरेदीचा जोर वाढल्याने निफ्टीमध्ये तेजी आली. दुपारनंतर निफ्टी १३७.९० अंकांच्या वाढीसह २३,४६६.९० अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, त्यानंतर झालेल्या नफावसुलीमुळे तेजी काहीशी कमी झाली. अखेर निफ्टी ११७.८० अंकांच्या वाढीसह २३,४४६.८० अंकांवर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये धातू क्षेत्रातील शेअर्सना सर्वाधिक मागणी मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा धातू निर्देशांक २.३७ टक्क्यांनी वधारला. एफएमसीजी निर्देशांकातही १.३० टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय रिअल्टी, दूरसंचार, बँकिंग, वाहन, भांडवली वस्तू, ग्राहक टिकाऊ वस्तू, आरोग्यसेवा, तेल व वायू तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या निर्देशांकातही तेजी राहिली. दुसरीकडे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री झाल्याने निफ्टीचा आयटी निर्देशांक ०.८७ टक्क्यांनी घसरला. बीएसईचा टेक निर्देशांक ०.३१ टक्के, तर मीडिया निर्देशांक ०.७६ टक्क्यांनी घसरला. व्यापक बाजारात मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या निर्देशांकात ०.७० टक्के आणि छोट्या कंपन्यांच्या निर्देशांकात ०.८९ टक्क्यांची वाढ झाली.

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे १.७९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईमध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४८३.५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील व्यवहाराच्या दिवशी हे बाजारमूल्य ४८१.७५ लाख कोटी रुपये होते.

दिवसभरातील व्यवहारात बजाज फायनान्स, हिंडाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, अपोलो हॉस्पिटल्स आणि जेएसडब्ल्यू स्टील आजच्या टॉप ५ सर्वाधिक वाढलेल्या शेअर्सच्या यादीत स्थान मिळवले. तर एचसीएल टेक्नॉलॉजी, टायटन कंपनी, इन्फोसिस, कोल इंडिया आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande