
सोलापूर, 23 सप्टेंबर (हिं.स.)।
भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन मृत्यू झालेल्या घोंगडे वस्ती येथील समर्थ स्वामी या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून एकूण पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून साडेतीन लाख रुपये, तर विद्यार्थी अपघात अनुदान योजनेतून दीड लाख रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
समर्थ स्वामी याला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीजची लागण झाली होती. उपचारादरम्यान २३ जुलै रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर स्वामी कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.
रेबीजमुळे मृत्यू झाल्यास नियमानुसार एक लाख रुपयांची मदत देण्यात येते. मात्र, आमदार कोठे यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून फेरप्रस्ताव मागवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेतीन लाख रुपयांची मदत मंजूर केली. तसेच विद्यार्थी अपघात अनुदान योजनेतून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दीड लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वामी कुटुंबीयांना एकूण पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
चौकट : नागरिकांच्या मदतीला प्राधान्य
सोलापूरसह राज्यातील गरजू नागरिकांना आवश्यकतेनुसार मदत मिळवून देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्राधान्य आहे. समर्थ स्वामीच्या मृत्यूची घटना समजल्यानंतर विशेष बाब म्हणून कुटुंबीयांना अधिकची आर्थिक मदत देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानुसार पाच लाख रुपयांची मदत मंजूर झाली. सोलापूरकरांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी आगामी काळातही आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड