
लातूर, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर जिल्हा दौऱ्यानंतर दुष्काळ जाहीर न झाल्याने काँग्रेसने राज्य सरकारवर टीका केली आहे. केंद्राच्या तारखांची कारणे न सांगता राज्य सरकारने तात्काळ लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी केली. तसेच दुष्काळ दौऱ्याचा निव्वळ फार्स कशासाठी केला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
लातूर जिल्ह्यात शेतकरी गंभीर संकटात असून शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतमजुरांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री दुष्काळ पाहणीसाठी जिल्ह्यात आले असताना दुष्काळ जाहीर होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र दुष्काळ जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे साळुंके यांनी म्हटले.
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असून आज उपग्रह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांची स्थिती, विहिरी, नद्या-नाले तसेच पिकांवरील कीड आणि नुकसानीची माहिती मिळू शकते. याशिवाय गावपातळीवर तलाठी, कृषी अधिकारी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करत आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत कशासाठी मागितली जात आहे, असा प्रश्न साळुंके यांनी उपस्थित केला.
शेजारील कर्नाटक सरकारने केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता २७ ऑगस्ट रोजी राज्यातील १५० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याचा दाखला देत महाराष्ट्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लष्करी अळीच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना थेट मदत जाहीर केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत, रब्बीच्या पेरणीसाठी ठोस उपाययोजना आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांचे सहाय्य देण्याची मागणी साळुंके यांनी केली. तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पुढील ८ ते १० महिन्यांचे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली.
गेल्या वर्षी जाहीर झालेली हेक्टरी १७ हजार ५०० रुपयांची मदत तसेच खरडून गेलेल्या जमिनींसाठी मनरेगातून जाहीर झालेली ३ लाख ४७ हजार रुपयांची मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा दावा साळुंके यांनी केला. त्यामुळे पुन्हा केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis