
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे उमेद अभियानांतर्गत तसेच पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप २०२६ उपक्रमाच्या माध्यमातून सखी-१३ महिला शेतकरी गटाने सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती करण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. जागृत सखी महिला शेतकरी गटातील सरस्वती मांयदळे यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजनानिमित्त करण्यात आलेले आकर्षक डेकोरेशन हे पूर्णपणे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीशी संबंधित साहित्याचा वापर करून करण्यात आले.
महिला शेतकरी गटाच्या वतीने ‘दहा टप्प्यांनुसार शेती’ करण्याच्या पद्धतीचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या पद्धतीचा अवलंब केल्यास शेतीतील अनावश्यक खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकते, असा संदेश यावेळी देण्यात आला. उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच शेतीविषयक विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जात आहे.
लोणी बुद्रुक येथील सखी-१३ महिला शेतकरी गटाच्या या उपक्रमामुळे गावातील इतर शेतकरी व महिलांमध्येही सेंद्रिय शेतीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, पारंपरिक शेतीला नैसर्गिक व शाश्वत पद्धतीची जोड देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis