
मनमाड, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी येथील पंपिंग स्टेशनवर आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे कार्यरत असलेले कर्मचारी प्रशांत काशिनाथ बोडके (वय ५७ वर्षे) यांचा काम करत असताना पाय घसरून पाण्याच्या टाकीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मनमाड शहर आणि परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रशांतला बाहेर काढले मात्र तोपर्यंत वेळ होउन गेला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी प्रशांत बोडके हे वागदर्डी येथील पंपिंग स्टेशनवर आपली रोजची कर्तव्ये बजावत होते. सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास काम करत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट पाण्याच्या टाकीत कोसळले. अचानक घडलेल्या या प्रसंगात त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व सहकाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु दुर्दैवाने त्यांना वाचवता आले नाही.दिवंगत प्रशांत बोडके (वय ५७) यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांची अंतिम यात्रा सायंकाळी ७:०० वाजता त्यांच्या केकाण नगर, HP गॅस गोडाऊनच्या मागील बाजूस असलेल्या राहत्या घरापासून निघाली होती. मनमाड नगरपरिषद कर्मचारी, नागरिक आणि बोडके परिवाराच्या आप्तेष्टांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI