
गुन्हे शाखा नाशिकरोड युनिटचे उद्घाटन
नाशिक, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। नाशिकरोड परिसरातील गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याबरोबरच गुन्ह्यांची उकल जलदगतीने होण्यास गुन्हे शाखा नाशिकरोड युनिटची मदत होणार असल्याचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सांगितले. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या शेजारी सुरू करण्यात आलेल्या गुन्हे शाखा नाशिकरोड युनिटचे उद्घाटन पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक शहरात गुन्हे शाखेचे विविध युनिट कार्यरत असून, नाशिकरोड परिसरासाठी स्वतंत्र युनिट सुरू करण्यात आल्याने या भागातील गुन्ह्यांच्या तपासाला अधिक गती मिळणार आहे. या युनिटच्या कार्यक्षेत्रात नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास, फरार व पाहिजे आरोपींचा शोध, अवैध शस्त्रे तसेच अंमली पदार्थांविरोधातील कारवाई आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या युनिटकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.
नाशिकरोड व परिसरात वाढणा-या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवरील जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यांच्या तपास यंत्रणेला गुन्हे शाखेच्या स्वतंत्र युनिटची साथ मिळणार असून, गुन्ह्यांची माहिती संकलित करून आरोपींचा माग काढण्यास तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक परिणामकारक करण्यास मदत होणार आहे.
यावेळी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे
अधिकारी व कर्मचारी तसेच नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. नवीन युनिटच्या माध्यमातून या परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाणार आहे.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, संजय पिसे, डॉ. अचल मुदगल, हेमंत तोडकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहब नाईकवाडे, नाशिकरोड युनियटचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI