
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)।तळेगाव ठाकूर येथे आज, बुधवार २३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजताच्या दरम्यान गाढ झोपेत असताना एका महिलेला सर्पदंश झाल्याची घटना घडली. सुदैवाने कुटुंबीयांनी तत्काळ हालचाल करून महिलेला रुग्णालयात दाखल केल्याने वेळेवर उपचार मिळाले आणि संभाव्य धोका टळला.
प्राप्त माहितीनुसार, तळेगाव ठाकूर येथील सौ. मनीषा सतीश बनकर (वय ३७ वर्षे) या पहाटे गाढ झोपेत असताना अचानक त्यांच्या खांद्याला काहीतरी रुतल्यासारखे जाणवले. त्यांना लगेच जाग आली. संशय आल्याने त्यांनी घराबाहेर असलेले पती सतीश बनकर यांच्याशी संपर्क साधला. सतीश बनकर हे त्यावेळी गणपती मंडळाजवळ महादेवाचे गाणे म्हणण्यासाठी गेले होते.
घटनेची माहिती मिळताच पतीसह मंडळातील कार्यकर्ते तातडीने घरी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी मनीषा बनकर यांना उपचारासाठी तत्काळ तिवसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथील इरविन रुग्णालयात रेफर करण्यात आले.वेळ न दवडता उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्यामुळे संभाव्य धोका टळला असून, सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी