रत्नागिरी : विषुवदिनी 'शहराचा अक्षांश' शोधण्याचा प्रयोग
रत्नागिरी, 23 सप्टेंबर (हिं.स.) । पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्र आणि भूगोल विषयाशी संबंधित एक अत्यंत नावीन्यपूर्ण व मार्गदर्शक उपक्रम राबवण्यात आला. विषुवदिनाचे (संपात दिन) औचित्य साधून शाळेत सूर्यकिरणांच्या मदतीने काठीची सावली
पटवर्धन हायस्कूलमध्ये विषुवदिन


रत्नागिरी, 23 सप्टेंबर (हिं.स.) । पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्र आणि भूगोल विषयाशी संबंधित एक अत्यंत नावीन्यपूर्ण व मार्गदर्शक उपक्रम राबवण्यात आला. विषुवदिनाचे (संपात दिन) औचित्य साधून शाळेत सूर्यकिरणांच्या मदतीने काठीची सावली मोजण्याचा प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत आपल्या शहराचा अक्षांश मोजण्याचा ज्ञानवर्धक अनुभव घेतला.

या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सपाट जमिनीवर सरळ काठी जमिनीला ९० अंशाच्या कोनात उभी केली व तिची उंची मोजली. स्थानिक दुपारी १२ ते १ या वेळेत दर ५ मिनिटांनी सावलीची लांबी मोजण्यात आली. सर्वांत लहान सावलीची नोंद करून गणितीय सूत्र काठीची उंची आणि सावलीची लांबी याद्वारे शहराचा अचूक अक्षांश कसा काढायचा, हे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शिकून घेतले. विद्यार्थ्यांचा या प्रयोगातील सहभाग अत्यंत उत्साही होता.

विद्यार्थ्यांमध्ये भूगोलाची आवड निर्माण करणाऱ्या या उपक्रमासाठी शाळेतील भूगोल विषय शिक्षक कौस्तुभ पालकर आणि विज्ञान विषय शिक्षक ओंकार वैद्य यांनी विशेष मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले. मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षिका कल्पना शिरोळकर आणि पर्यवेक्षक अमर लवंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रायोगिक शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande