
रत्नागिरी, 23 सप्टेंबर (हिं.स.) । शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील संस्कृत शिक्षणामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखळकर यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळाच्या वतीने गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित संस्कृत गुणगौरव समारंभ, कृतिसत्र उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संस्कृत भारतीचे संस्कृतभारती पश्चिमक्षेत्र प्रशिक्षण प्रमुख नीरज दांडेकर, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तथा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, रत्नागिरी संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्मिता सरदेसाई, व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. साखळकर म्हणाले की, उच्च शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाले असले तरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर इतर विषयांच्या तुलनेत संस्कृतची अभ्यासक्रमातील स्थिती आणि अंमलबजावणीचे काम अजून प्रगतिपथावर आहे. संस्कृत ही प्राचीन भाषा असून वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता, कालिदासांचे साहित्य, गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र, व्याकरण आणि तत्त्वज्ञान यांसारख्या सर्व ज्ञानशाखांचे मूळ आणि अमूल्य ठेवा संस्कृत भाषेत उपलब्ध आहे.
महाविद्यालयात संस्कृतचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयामध्ये बीए संस्कृत, एमए संस्कृत तसेच इतर २८ पदवी अभ्यासक्रम आणि १६ पदव्युत्तर अभ्यासक्रम पद्धतीप्रमाणे शिकवले जात आहेत. महाविद्यालयाने संस्कृत हा विषय आर्ट्स फॅकल्टीव्यतिरिक्त सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टीमध्येदेखील 'ऍबिलिटी एन्हान्समेंट कोर्स' म्हणून क्रेडिट्सच्या स्वरूपात सुरू केला आहे, जेणेकरून इतर शाखेच्या विद्यार्थ्यांनाही संस्कृत शिकता येईल.
नीरज दांडेकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. २०३० पर्यंत सर्व राज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. यात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश केला आहे. त्यामुळे या बदलाकडे शिक्षकांनी सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकारचा शालेय अभ्यासक्रम आराखडा मिळताजुळता आहे. बदललेल्या उच्च शिक्षण अभ्यासक्रमाचा विचार करून शालेय अभ्यासक्रम बदलला तर विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होतील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व संस्कृत शिक्षक आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे संस्कृतचे विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी