
बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बीड जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकरी बांधवांना तातडीने आवश्यक मदत व सवलती द्याव्यात, या प्रमुख मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) सरचिटणीस तथा आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर निर्माण झालेली परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि त्यांच्या हक्काची मदत मिळवून देणे, हा या आंदोलनामागचा प्रमुख उद्देश आहे.
शासनाने बीड जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना आवश्यक सवलती द्याव्यात, अशी आमची ठाम मागणी आहे.
आजचा हा मोर्चा केवळ आंदोलन नाही, तर संकटात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हक्काचा बुलंद आवाज आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील, दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, असे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis