अलिबाग : आदर्श मित्र मंडळात 'लोकसंवाद' संपन्न
रायगड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। अलिबाग माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श मित्र मंडळ घरत आळी, अलिबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे ‘लोकसंवाद २०२६’ हा अभिनव कार्यक्रम मोठ्या
अलिबाग


रायगड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। अलिबाग माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श मित्र मंडळ घरत आळी, अलिबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे ‘लोकसंवाद २०२६’ हा अभिनव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी युवकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त श्रीकांत कोकाटे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त २९ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत एकाच वेळी ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळावे तथा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेतून राज्याच्या रोजगार क्षेत्रात नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

या रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत रायगड जिल्ह्यात तब्बल १२ महत्त्वाच्या केंद्रांवर रोजगार मेळावे पार पडणार आहेत. यामध्ये नवीन पनवेल येथील अंजुमन आय इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पस, माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे), खारघर येथील आयटीएम कौशल्य विद्यापीठ व रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पाली-सुधागड येथील शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालय, कर्जत तालुक्यातील यादवराव तासगावकर तंत्रनिकेतन, रोहा तालुक्यातील भारतीय एज्युकेशन ट्रस्ट (वेलशेत) व श्रीमती गीता डी. तटकरे तंत्रनिकेतन (गोवे-कोलाड), खोपोली येथील केटीएसपीएम बी. एल. पाटील तंत्रनिकेतन, कामोठे येथील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, पेण येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय आणि अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या महाकुंभाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कोकाटे यांनी केले. या कार्यक्रमास आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष रविकिरण आंबेकर, पदाधिकारी, नागरिक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande