
परभणी, 24 सप्टेंबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील गरजू वृद्धांच्या डोळ्यांतील अंधार दूर करून त्यांना पुन्हा नव्याने जग पाहता यावे, या उद्देशाने दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया उपक्रम राबविण्यात येत आहे. पाथरी तालुक्यातील वडी व कासापुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरातून निवड झालेल्या 25 रुग्णांना पुढील मोफत शस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले.
राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. हादगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. क्षीरसागर, मस्के तसेच गावातील आशा स्वयंसेविकांचे सहकार्य लाभले. रंगनाथ सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात तपासणी केल्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या 25 रुग्णांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे. रुग्णांची मुंबईपर्यंत ने-आण, निवास, भोजन तसेच शस्त्रक्रियेचा खर्च प्रतिष्ठान उचलणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहणार्या ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
रुग्णांना मुंबईकडे रवाना करताना प्रताप शिंदे, पांडुरंग (पप्पू) नखाते, महादेव नवघरे, नेत्रतज्ज्ञ डॉ. राम जाधव, संजय कोल्हे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, दीपस्तंभ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल उमरा ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, रंगनाथ सोळंके आणि दीपस्तंभ प्रतिष्ठानचे आभार मानण्यात आले. एका शस्त्रक्रियेमुळे केवळ रुग्णाला दृष्टी मिळत नाही, तर त्याच्या कुटुंबाच्या जीवनातही नव्या आशेचा उजेड निर्माण होतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis