
मुंबई, २४ सप्टेंबर (हिं.स.) : संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'लव्ह अँड वॉर'बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून काही काळ बाकी असला तरी, निर्मात्यांनी रणबीर कपूरचा पहिला अधिकृत लूक सादर करून मोठी चर्चा घडवून आणली आहे. भन्साळी प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये रणबीर एका वेगळ्या आणि अत्यंत गंभीर अवतारात दिसत आहे.
या पोस्टरमध्ये रणबीर गाडी चालवताना दिसत आहे. त्याचा एक हात गंभीररीत्या जखमी आणि रक्ताने माखलेला आहे, तर त्याच्या चेहऱ्यावर राग आणि तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे. या दृश्यावरून त्याचे पात्र युद्धासाठी सज्ज असल्याचे संकेत मिळतात. 'ॲनिमल' चित्रपटानंतर रणबीर पुन्हा एकदा अशाच रक्ताने माखलेल्या आणि आक्रमक रूपात दिसत आहे. पोस्टरसोबत निर्मात्यांनी लिहिले आहे, तो रुबाब, तो दिव्यभाव, ती उत्कटता!
'लव्ह अँड वॉर'मध्ये रणबीर कपूरसोबतच आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट युद्ध आणि प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आधारित एक 'ॲक्शन-ड्रामा' आहे. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर