


रायगड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील भूजल संसाधनांचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय जलधारक स्तर नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम (NAQUIM) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या अहवालातील माहितीचा सर्व विभागांनी प्रभावी उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय भूजल मंडळातर्फे (CGWB) आयोजित अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय भूजल मंडळ, पुणे येथील पौर्णिमा बराहाते यांनी जिल्ह्यातील भूजल पातळी, गुणवत्ता, पुनर्भरण क्षमता आणि जलधारक स्तरांच्या स्थितीवर सविस्तर सादरीकरण केले. तसेच हेमलता व्ही. यांनी NAQUIM अंतर्गत मिळालेल्या वैज्ञानिक माहितीचा उपयोग प्रत्यक्ष नियोजनात कसा करावा, याचे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे अधिकारी सहभागी झाले होते. भूजल हे पिण्याचे पाणी, शेती व विकासाचा कणा असल्याने कृत्रिम पुनर्भरण, पाणलोट विकास आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. विकासकामे व योजना आखताना या अहवालातील निष्कर्षांचा आधार घेतल्यास रायगडमधील भूजल व्यवस्थापनाला मोठी दिशा मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)