नाती जपा, कुटुंबासोबत आनंदी राहा - डॉ. विठ्ठलराव लहाने
लातूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। “आनंद शोधण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही; नाती जपा, कुटुंबासोबत आनंदी राहा!” प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळात प्रेरणादायी व्याख्यान स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ, सा
विठ्ठल लहाने


लातूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

“आनंद शोधण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही; नाती जपा, कुटुंबासोबत आनंदी राहा!”

प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळात प्रेरणादायी व्याख्यान

स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ, साईनगर, अहमदपूर यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव पुंडलिक लहाने यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष भाऊ मजगे यांनी प्रास्ताविक केले. मंडळाच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून गणेशोत्सव सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य, सामाजिक जनजागृती, स्वच्छता तसेच समाजोपयोगी विविध उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांनी आपल्या ओघवत्या व प्रेरणादायी शैलीत उपस्थितांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश दिला. दुभंगलेले ओठ व टाळू यांसारख्या समस्यांवर शस्त्रक्रिया करून अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे डॉ. लहाने यांनी यावेळी आरोग्यासोबतच “आनंदी जीवन कसे जगावे?” याविषयी मार्गदर्शन केले.

“जीवनातील खरा आनंद हा केवळ पैसा, पद किंवा प्रतिष्ठेमध्ये नसून आपल्या माणसांमध्ये आणि नात्यांमध्ये असतो,” असे सांगत त्यांनी आई-वडील, पत्नी, भाऊ-बहीण व नातेवाईक यांच्याशी प्रेमाने व जिव्हाळ्याने संबंध ठेवण्याचे आवाहन केले. मुलांवर चांगले संस्कार करावेत, त्यांना योग्य दिशा द्यावी तसेच मित्रसंगत चांगली असावी, यावरही त्यांनी विशेष भर दिला.

व्यवसायातील ताणतणाव आणि धावपळ यामुळे कुटुंबापासून दूर जाऊ नये, असा महत्त्वपूर्ण संदेश देताना डॉ. लहाने यांनी दिवसभराच्या कामाचा ताण घराच्या उंबरठ्यावरच ठेवून घरी प्रवेश करण्याचा सल्ला दिला. घरी गेल्यानंतर चेहऱ्यावर आनंद ठेवावा आणि कुटुंबीयांसोबत प्रेमाने वागावे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवणे हीच जीवनातील मोठी संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रेरणादायी व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. लहाने यांच्या विचारांमुळे उपस्थितांना जीवनातील नातेसंबंध, कुटुंब, संस्कार आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व नव्याने जाणवले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. प्रतीक जी. लंबे साहेब होते. व्यासपीठावर स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष भाऊ मजगे साहेब तसेच यावर्षीचे मंडळाचे अध्यक्ष श्री. धर्मराज वैजनाथ चावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गजानन सोमवंशी सर यांनी प्रभावीपणे केले. शेवटी मंडळाचे अध्यक्ष श्री. धर्मराज चावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित या प्रेरणादायी व्याख्यानामुळे गणेशोत्सवाला सामाजिक प्रबोधनाची सुंदर जोड मिळाली. सकारात्मक विचार, कौटुंबिक नात्यांमध्ये जिव्हाळा आणि जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

याप्रसंगी मंडळातील श्री. नरसीमलू पामुलावार, विनायक नागरगोजे, बालाजी चावरे, संकेत गिरी, शिवराज चोतवे, रमेश जाधव, राजू जाधव, ऋषी पामुलावार, राहुल भालेराव, देवा उराडे, अभिजीत कदम, विशाल लहाने, श्वेत पाटील, बालाजी कानवटे, मारुती हेमनर, सुधाकर शेट्टी, सतीश बिलापट्टे, महेश जाधव, आकाश महाजन, अनिकेत काशीकर, ज्ञानोबा चाटे, संदीप पांचाळ, राम गंगथडे, प्रसन्न गोरे, गणेश तोडकर, दिपक मजगे, बोंडगे सर, हरगिले सर, वेंकट गुट्टे, सनकाळे सर, चंद्रकांत मिरजगावे, राहुल भोसले व समस्त गणेश भक्त उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande