
इस्लामाबाद, 24 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढला आहे. पाकिस्तानने गुरुवारी पहाटे अफगाणिस्तानातील १० ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचे सांगितले. या ठिकाणांचा वापर एक दिवस आधी पाकिस्तानवर ड्रोन हल्ले करण्यासाठी करण्यात आला होता, असा पाकिस्तानचा दावा आहे. दोन्ही देशांदरम्यान सीमेवर गोळीबार आणि घुसखोरीचे आरोप सातत्याने वाढत असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रादेशिक देशांच्या मध्यस्थीने शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानातील १० ठिकाणांना लक्ष्य केले. त्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अफगाण तालिबानकडून आठ ड्रोन पाठवण्यात आल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, हे ड्रोन कोहाट शहर आणि तोरखम सीमावर्ती भागात पोहोचण्यापूर्वीच पाडण्यात आले. सर्व ड्रोन नष्ट करण्यात आले असून त्यांच्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, सीमापार घुसखोरीचा प्रयत्नही आपल्या सैन्याने हाणून पाडल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.
अफगाण तालिबान सरकारने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी बुधवारी सांगितले होते की, अफगाण तालिबानच्या सैन्याने पाकिस्तानवर कोणताही हल्ला केलेला नाही. पाकिस्तानच्या ताज्या हवाई हल्ल्यांवर काबूलकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
यापूर्वीही पाकिस्तानने पूर्व अफगाणिस्तानातील लढवय्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानने ही कारवाई दहशतवाद्यांविरोधातील अभियान असल्याचे म्हटले होते, तर अफगाण अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानच्या दिशेने कथित घुसखोरीचा प्रयत्न झाल्यानंतर तालिबानच्या सैन्याने पाकिस्तानी सीमा चौक्यांवर मोर्टार आणि जड शस्त्रांनी हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्याने तोफगोळ्यांचा मारा करत तालिबानच्या सीमा चौक्या, मोर्टार तळ आणि संरक्षणात्मक ठिकाणांना लक्ष्य केले.
अधिकाऱ्यांनी दावा केला की, तालिबानचे काही जवान आपल्या चौक्या सोडून निघून गेले आणि त्यांचेही नुकसान झाले. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
पाकिस्तान या घुसखोरांना ‘फितना-उल-खवारिज’ असे संबोधतो. पाकिस्तानमध्ये हा शब्द पाकिस्तानी तालिबानसाठी वापरला जातो. पाकिस्तान दीर्घकाळापासून अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारवर आपल्या भूमीवरून पाकिस्तानविरोधी लढवय्यांना कारवाया करण्याची परवानगी दिल्याचा आरोप करत आहे. काबूलने हे आरोप फेटाळले आहेत.
पाकिस्तानचा दावा आहे की, पाकिस्तानी तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित गटांनी अलीकडच्या काळात सुरक्षा दलांवरील हल्ले वाढवले आहेत.
याच महिन्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अफगाणिस्तानातून सीमापार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १५ लढवय्यांना ठार केल्याचा दावा केला होता. सोमवारी झालेल्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानने २८ लढवय्ये ठार झाल्याचे सांगितले होते. मात्र, अफगाण अधिकाऱ्यांनी किमान तीन नागरिकांचा मृत्यू आणि चार जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तान मिशननेही नागरिकांच्या हानीची पुष्टी केली होती.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या लष्करी कारवायांमुळे चीन, तुर्किये, कतार आणि सौदी अरेबिया यांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना धक्का बसण्याची शक्यता आहे.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानात २० हून अधिक पाकिस्तानविरोधी दहशतवादी गटांच्या उपस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अलीकडील तणावाच्या पार्श्वभूमीवर खैबर पख्तूनख्वामधील हंगू जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सहा पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या काही दिवस आधी कोहाटमधील पोलीस संकुलातील मशिदीत आत्मघाती हल्ला झाला होता. त्यानंतर आठ बंदूकधाऱ्यांनी पोलीस संकुलावर हल्ला केला. सुमारे २० तास चाललेल्या चकमकीत किमान २१ जणांचा मृत्यू झाला होता.पाकिस्तानने या घटनांसाठी पाकिस्तानी तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित गटांना जबाबदार धरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode