युद्धातून शांतता येणार नाही, यूएनजीएमध्ये पेजेश्कियान यांचा अमेरिकेवर निशाणा
आल्बनी, 24 सप्टेंबर (हिं.स.)।इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत (यूएनजीए) केलेल्या भाषणादरम्यान अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत मोठे वक्तव्य केले. इराणचे नागरिक अमेरिका आणि इस्रायलच्या दहशतवादाचे बळी ठरत असल्
युद्धातून शांतता येणार नाही, यूएनजीएमध्ये पेजेश्कियान यांचा अमेरिकेवर निशाणा


आल्बनी, 24 सप्टेंबर (हिं.स.)।इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत (यूएनजीए) केलेल्या भाषणादरम्यान अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत मोठे वक्तव्य केले. इराणचे नागरिक अमेरिका आणि इस्रायलच्या दहशतवादाचे बळी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच युद्धाच्या मैदानातून शांतता प्रस्थापित होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इराणविरोधातील अमेरिकेच्या कारवाईवर टीका करताना पेजेश्कियान म्हणाले की, या समस्येचे लष्करी मार्गाने निराकरण होऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावरून त्यांनी इराणविरोधातील अमेरिकेच्या कारवाईच्या परिणामांचाही उल्लेख केला. पेजेश्कियान यांनी दावा केला की, गेल्या २०० वर्षांत इराणने कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही. इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात ठार झालेले सर्वोच्च नेते अली खामेनेई तसेच युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत ठार झालेल्या १५० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांची मोठी छायाचित्रेही त्यांनी सभागृहात दाखवली.ते म्हणाले, “आम्ही केवळ आमचा बचाव केला आहे. आम्ही दहशतवादी नाही.”

अमेरिका आणि इस्रायलने त्यांच्या देशावर हल्ला केला, मात्र इराणने गुडघे टेकले नाहीत, असे पेजेश्कियान यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेत ते म्हणाले की, इराण चर्चा, मुत्सद्देगिरी आणि संवादासाठी तयार आहे; मात्र बळाच्या भाषेचा स्वीकार करणार नाही.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलवरही गंभीर आरोप केले. इस्रायल विविध शहरे आणि प्रांतांमधील भागांना लक्ष्य करून हत्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गाझाचा उल्लेख करताना पेजेश्कियान यांनी दावा केला की, तेथे ८० हजारांहून अधिक निष्पाप नागरिक मारले गेले आहेत.

आपल्या भाषणाच्या शेवटी पेजेश्कियान यांनी ट्रम्प यांचे नाव घेत म्हणाले, “मिस्टर ट्रम्प आणि जे लोक आम्हाला धमकावू इच्छितात, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, आम्ही बळजबरीची भाषा स्वीकारणार नाही. आम्ही चर्चा, मुत्सद्देगिरी आणि संवादासाठी तयार आहोत.”त्यांनी पुढे दावा केला, “आम्ही सामान्य नागरिकांवर हल्ला केलेला नाही.”

पेजेश्कियान यांचे हे भाषण डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणाच्या एका दिवसानंतर झाले. ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतील आपल्या भाषणात इराणसोबत लवकर करार झाला नाही, तर ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणला “उद्ध्वस्त” करू शकतात, असा इशारा दिला होता.

तसेच नोव्हेंबरमधील निवडणुकीनंतर इराणसोबत करार होईल, अशी आशाही ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. ट्रम्प म्हणाले की, ते युद्धापासून पळ काढत नाहीत. अमेरिकेकडे शस्त्रसाठा कमी झाला असल्याचे सांगणारे लोक पूर्णपणे चुकीचे आहेत. अमेरिका अजूनही आपल्या मित्रदेशांना शस्त्रांचा पुरवठा करत आहे.

इराणला आणखी एक संधी देण्याची आपली इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकन सैन्याने इराणचे मोठे नुकसान केले असून इराणची नौदल, हवाई दल आणि लष्कर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, इराण चर्चेच्या टेबलावर आल्यास अमेरिका इराणच्या पुनर्बांधणीस मदत करेल आणि त्याला इस्लामिक देशांमधील सर्वात शक्तिशाली व मजबूत देश बनवण्यास मदत करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले.

यानंतर काही तासांनी ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांनी इराणी अधिकाऱ्यांसोबत सुमारे तीन तास बैठक घेतली. ट्रम्प यांनी ही बैठक “अतिशय चांगली” झाल्याचे सांगितले; मात्र बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली नाही. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनीही ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये पेजेश्कियान यांची भेट घेण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

मात्र, इराणने या बैठकीला फारसे महत्त्व दिले नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की, कतारच्या मध्यस्थीने झालेली अप्रत्यक्ष चर्चा ही काही नवीन बाब नाही. इराणने अमेरिकेकडे आपल्या बंदरांची नाकेबंदी उठवण्याची आणि गोठवलेल्या इराणी मालमत्ता व निधीवरील निर्बंध हटवून ती रक्कम मुक्त करण्याची मागणी पुन्हा केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande