शी जिनपिंग अमेरिकेत दाखल होताच अमेरिका-चीन व्यापार युद्धविरामाला मिळाली मुदतवाढ
वॉशिंग्टन, 24 सप्टेंबर (हिं.स.)।चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेत दाखल झाले आहेत. ११ वर्षांनंतर त्यांचा हा अमेरिका दौरा होत आहे. अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेत पोहोचताच चीनला मोठी बातमी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्
शी जिनपिंग अमेरिकेत दाखल होताच अमेरिका-चीन व्यापारयुद्धविरामाला मिळाली मुदतवाढ


वॉशिंग्टन, 24 सप्टेंबर (हिं.स.)।चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेत दाखल झाले आहेत. ११ वर्षांनंतर त्यांचा हा अमेरिका दौरा होत आहे. अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेत पोहोचताच चीनला मोठी बातमी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत सुरू असलेला व्यापारयुद्धविराम पुढे वाढवला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी अमेरिका आणि चीनदरम्यान सुरू असलेला व्यापारयुद्धविराम पुढे वाढवण्यावर सहमती झाल्याची घोषणा केली आहे.

शी जिनपिंग पत्नी पेंग लियुआन यांच्यासह अमेरिकेत पोहोचले. यावेळी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः जॉइंट बेस अँड्र्यूज येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे स्वागत केले.ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण सहमती झाली आहे. वृत्तानुसार, अमेरिका आणि चीनने व्यापारयुद्धविराम १० जानेवारी २०२७ पर्यंत वाढवला आहे. यापूर्वी हा व्यापारयुद्धविराम १० नोव्हेंबर रोजी संपणार होता. मात्र, आता तो जवळपास दोन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे शुल्कासह इतर व्यापारविषयक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू ठेवता येणार आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या भेटीबाबत भूमिका मांडली. रुबियो म्हणाले, “अमेरिका आणि चीनमध्ये मतभेद आहेत; मात्र दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सर्वोच्च स्तरावर संवाद होणे आवश्यक आहे.”अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. तसेच दोन्ही देशांची लष्करी शक्तीही जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी शक्तींमध्ये गणली जाते, असेही रुबियो यांनी सांगितले.

ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी दोन्ही देशांमधील व्यापारविषयक तणाव वाढला होता. त्यामुळे अमेरिका-चीन व्यापार कराराच्या चर्चेलाही खीळ बसली होती. दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात शुल्क लावले होते. मात्र, आता अमेरिका आणि चीनमधील संबंधांमध्ये काही प्रमाणात नरमाई आली आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेत पोहोचताच त्यांच्या अधिकृत कार्यक्रमांना सुरुवात झाली. यामध्ये व्हाईट हाऊसमधील औपचारिक स्वागत, शासकीय मेजवानी आणि नॅशनल आर्काइव्ह्जला संयुक्त भेट यांचा समावेश आहे.शी जिनपिंग यांना घेऊन आलेले एअर चायना विमान माध्यमांसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठासमोर पोहोचले, तेव्हा कर्मचाऱ्यांनी सुमारे १०० फूट लांबीचा लाल गालिचा अंथरला. लाल गालिच्याच्या शेवटी डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग शेजारीशेजारी उभे राहिले. त्यांच्या दोन्ही बाजूंना अमेरिका आणि चीनचे राष्ट्रध्वज लावण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande