
वॉशिंग्टन, 24 सप्टेंबर (हिं.स.)।चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वॉशिंग्टन येथे पोहोचल्यानंतर चीन-अमेरिका संबंधांबाबत मोठे वक्तव्य केले. दोन्ही देशांनी एकमेकांचे ‘प्रतिस्पर्धी नव्हे, तर भागीदार’ बनले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. बदलत्या काळात चीन आणि अमेरिका परस्पर संबंध पुढे नेण्यासाठी योग्य मार्ग शोधू शकतात, असा विश्वासही शी जिनपिंग यांनी व्यक्त केला.
शी जिनपिंग हे पत्नी पेंग लियुआन यांच्यासह अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी जॉइंट बेस अँड्र्यूज येथे त्यांचे स्वागत केले. विमानतळावर अमेरिकन हवाई दलाच्या बँडने वादन केले. यावेळी दोन्ही देशांचे राष्ट्रध्वजही लावण्यात आले होते.वर्ष १९६२ नंतर प्रथमच एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी लष्करी तळावर वैयक्तिकरित्या एखाद्या परदेशी नेत्याचे स्वागत केले असल्याचे सांगितले जात आहे.
चीनची सरकारी वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, शी जिनपिंग यांनी आपल्या लिखित भाषणातून अमेरिकन जनतेला चिनी जनतेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. चीन आणि अमेरिका हे दोन्ही महान देश असून, दोन्ही देशांतील जनताही महान आहे, असे त्यांनी म्हटले. चीन आणि अमेरिकेतील जनतेमध्ये दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध असून, दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परांशी खोलवर जोडलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शी जिनपिंग म्हणाले की, चीन आणि अमेरिकेने एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी भागीदारीच्या मार्गावर पुढे जावे. चिनी राष्ट्राच्या महान पुनरुत्थानाचे उद्दिष्ट आणि अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचे ध्येय एकाच वेळी पुढे जाऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.दोन्ही देश एकमेकांच्या यशाला हातभार लावू शकतात आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी योगदान देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
शी जिनपिंग यांनी म्हटले की, चीन आणि अमेरिकेने एकाच दिशेने काम केले पाहिजे आणि सहकार्याला केंद्रस्थानी ठेवून स्थिर संबंध निर्माण केले पाहिजेत. दोन्ही देशांमधील स्पर्धा मर्यादित ठेवली पाहिजे, मतभेद योग्य पद्धतीने हाताळले पाहिजेत आणि शांततेसाठी केलेली आश्वासने पाळली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
चीन आणि अमेरिकेसारख्या दोन मोठ्या देशांनी नव्या युगात एकमेकांसोबत शांततेने राहण्याचा योग्य मार्ग शोधला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. जग बदलत आहे आणि काळही बदलत आहे; मात्र चीन आणि अमेरिकेच्या शांततापूर्ण सहअस्तित्वाची ऐतिहासिक दिशा बदललेली नाही, असे शी जिनपिंग यांनी नमूद केले.दोन्ही देशांच्या जनतेमधील मैत्रीपूर्ण संबंधांची भावना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची चीन-अमेरिका संबंध स्थिर राहावेत ही अपेक्षाही कायम आहे, असे त्यांनी सांगितले.
शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चीन-अमेरिका संबंध आणि जागतिक परिस्थितीशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यामध्ये व्यापार शुल्क, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), लष्करी संबंध, पश्चिम आशियातील संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध, अंतराळातील शस्त्रास्त्रांची स्पर्धा आणि तैवानला अमेरिकेकडून होणारी शस्त्रास्त्र विक्री या मुद्द्यांचा समावेश आहे.दोन्ही देशांमधील धोरणात्मक स्थैर्यावर आधारित रचनात्मक संबंध अधिक मजबूत करण्यासोबतच विविध क्षेत्रांमध्ये संपर्क आणि सहकार्य वाढवण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेतील विविध क्षेत्रांतील नागरिकांशी व्यापक स्तरावर संवाद साधून मैत्री अधिक दृढ करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
दोन्ही बाजूंच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा दौरा फलदायी ठरेल, असा विश्वास शी जिनपिंग यांनी व्यक्त केला. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात वाढ होईल आणि जागतिक शांततेसाठी नव्या आशा निर्माण होतील, असे त्यांनी म्हटले.
शी जिनपिंग यांच्यासोबत चीनच्या शिष्टमंडळात चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या राजकीय ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य आणि केंद्रीय समितीच्या सामान्य कार्यालयाचे संचालक काई ची यांचा समावेश आहे. तसेच केंद्रीय समितीच्या राजकीय ब्युरोचे सदस्य आणि परराष्ट्रमंत्री वांग यी हेही शिष्टमंडळात सहभागी आहेत.शी जिनपिंग यांचा हा २०१५ नंतरचा पहिला वॉशिंग्टन दौरा असल्याचे सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode