ल्यूक विल्यम्स यांची 'वुमेन्स प्रीमियर लीग'साठी मुंबई इंडियन्सचच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
मुंबई, 24 सप्टेंबर (हिं.स.) मुंबई इंडियन्सने ल्यूक विल्यम्स यांची ''वुमेन्स प्रीमियर लीग'' (WPL) मधील संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याआधी या पदावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू लिसा कीटली यांनी ही जबाबदारी सोडली आहे
ल्यूक विल्यम्स


मुंबई, 24 सप्टेंबर (हिं.स.) मुंबई इंडियन्सने ल्यूक विल्यम्स यांची 'वुमेन्स प्रीमियर लीग' (WPL) मधील संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याआधी या पदावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू लिसा कीटली यांनी ही जबाबदारी सोडली आहे. मुंबई इंडियन्सने जाहीर केले आहे की, लिसा कीटली यांनी मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्या जागी ल्यूक विल्यम्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघाच्या सह-मालक नीता एम. अंबानी म्हणाल्या, मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात ल्यूक विल्यम्स यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ल्यूक हे एक यशस्वी व्यक्तिमत्त्व आहेत; त्यांच्याकडे समृद्ध अनुभव आणि महिला क्रिकेटची सखोल समज आहे, तसेच खेळाडूंच्या विकासासाठी त्यांची असलेली कटिबद्धताही मोलाची आहे. आमच्या क्रिकेटपटूंनी WPL मध्ये अभिमानास्पद वारसा निर्माण केला आहे. मला खात्री आहे की, ल्यूक यांचे मार्गदर्शन आणि हरमनप्रीतचे नेतृत्व यांच्या जोरावर त्या प्रगती करत राहतील, अधिक यश मिळवतील आणि सर्वत्रच्या तरुणींना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करतील. या रोमांचक नवीन प्रवासाची सुरुवात करताना मी ल्यूक आणि संपूर्ण संघाला शुभेच्छा देते.तसेच, मुंबई इंडियन्ससाठी दिलेल्या योगदानाबद्दल मी लिसा कीटली यांचे आभार मानते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते.

मुख्य प्रशिक्षक ल्यूक विल्यम्स म्हणाले, मुंबई इंडियन्ससारख्या प्रतिष्ठित आणि यशस्वी संस्थेत सामील होण्यासाठी आणि येथील प्रतिभावान खेळाडू व सपोर्ट स्टाफसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. एकत्र काहीतरी उत्तम निर्माण करण्याची, रोमांचक क्रिकेट खेळण्याची आणि यशासाठी स्पर्धा करण्याची आमच्याकडे एक मोठी संधी आहे. या आव्हानाचा सामना करण्यास आणि आमच्या चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यास मी सज्ज आहे.

ग्रेड क्रिकेटमधील कामगिरीसाठी तीन वेळा 'ब्रॅडमन मेडल' (२००५/०६, २००७/०८ आणि २००९/१० या हंगामांत) जिंकणाऱ्या विल्यम्स यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत अशा विविध देशांत दोन दशके प्रशिक्षक म्हणून काम केले आहे; यात २०२५ पासून इंग्लंडच्या महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून बजावलेल्या भूमिकेचाही समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande