
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे सुरू असलेल्या ४१ व्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत भक्ती कथा महोत्सवामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांचे अत्यंत प्रबोधनपर व मार्गदर्शक कीर्तन झाले. 'आवडे पंढरी भीमा चंद्रभागा' या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तीन चरणांच्या अभंग व वचनावर निरूपण करताना महाराजांनी उपस्थितांना मोलाचे वैचारिक व आध्यात्मिक मार्गदर्शन केले.
कीर्तनाच्या ओघात विस्तृत विवेचन करताना महाराजांनी सांगितले की, कामधेनु, कल्पतरू आणि चिंतामणी या सर्व गोष्टींपेक्षा माणसाचे उत्तम आरोग्य आणि त्याचे उच्च विचार सर्वात मोठे राहिले पाहिजेत. मानवी जीवन उन्नत करण्यासाठी संतवाङ्मय हाच सर्वात मोठा वास्तव विचार देणारा आणि योग्य दिशा दाखवणारा मंच आहे. आजच्या समाजात विचारांचे सौंदर्य मोठे असावे, कारण विचारांतून आलेली माणसे आयुष्यभर टिकतात, तर विकृतीतून आलेले विचार व माणसे काही काळच टिकतात. माणसाने नेहमी पवित्र विचारांचे व आचरणाचे असणेच योग्य ठरते.
पुढे बोलताना त्यांनी वारकरी संप्रदाय व संस्कृतीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, खादीच्या कपड्यापेक्षा मळका वारकरी केव्हाही श्रेष्ठ व बरा असतो, त्यामुळे कधीही कोणाचे पाय धुऊ नका, सर्वांचा आदर करा. कॅप्टन खरात बाबा आला आणि गेला, परंतु समाजातील खरी अंधश्रद्धा साधुसंतांच्या विचारांनी व कार्यातूनच नष्ट झाली आहे. माणसाने आपल्या जीवनशैलीत वारकरी विचारांचा व मूल्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्रीमद भागवत भक्ती कथा महोत्सवाच्या या ४१ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळ, पांढरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवास श्री.ह.भ.प. महंत शिवाजी महाराज (क्षेत्र नारायणगड) यांच्या शुभ आशीर्वादाने, श्री.ह.भ.प.वै. गुरुवर्य गंगाधर महाराज (पौळाचीवाडीकर) यांच्या आशीर्वादाने तसेच श्री.ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी (राजपिंपरी) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व भागवताचार्य श्री. वसंत महाराज बल्लाळ (खलापुरी) यांच्या कथाप्रसंगाने भाविकांची मोठी गर्दी लाभली असून, या चौथ्या दिवसाच्या कीर्तन सोहळ्याने संपूर्ण पांढरवाडी परिसर भक्तिमय व चैतन्यमय झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis