अमरावती - खारवगळ नाल्यावर पुलाची प्रतीक्षा
अमरावती, 03 सप्टेंबर (हिं.स.)। चांदूररेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील खारवगळ नाल्यावर तातडीने पक्का पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी चांदूररेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. येत्या एका आठवड्यात पुलाच्या
खारवगळ नाल्यावर पुलाची प्रतीक्षा


अमरावती, 03 सप्टेंबर (हिं.स.)। चांदूररेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील खारवगळ नाल्यावर तातडीने पक्का पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी चांदूररेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. येत्या एका आठवड्यात पुलाच्या कामाबाबत ठोस निर्णय न झाल्यास सात सप्टेंबर २०२६ पासून खारवगळ नाल्याजवळ बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. घुईखेड येथील खारवगळ नाल्याच्या पलीकडे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीजमिनी आहेत. मात्र पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागतो. संततधार पावसामुळे नाल्याची पाणीपातळी वाढल्यानंतर शेतकरी व शेतमजुरांचा शेतीकडे जाणारा मार्ग अत्यंत धोकादायक बनतो. अनेकदा अचानक पूर आल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात अडकून पडण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नाल्यातील पाण्यामुळे परिसरातील शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे. बेंबळा धरणामुळे पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. तसेच खारवगळ नाल्याचे पाणी चंद्रभागा नदीत सुरळीतपणे प्रवाहित होत नसल्याने नाल्यात पाणीसाठा वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाल्याचे खोलीकरण झाल्यानंतर गेल्या १५ ते १७ वर्षांपासून या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा राहत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. खारवगळ नाल्यावर पक्का पूल उभारण्याची मागणी शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे लावून धरली आहे. २०१७ मध्ये तत्कालीन खासदार रामदास तडस यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून पुलाच्या निधीसंदर्भात पत्र दिले होते. मात्र त्यानंतरही पुलासाठी निधी मंजूर झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी आमदार प्रताप अडसड यांनीही पुलाचे काम प्राधान्याने करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. खारवगळ नाल्यावर तातडीने पक्का पूल बांधण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी, निधी मंजूर करावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नाल्याच्या पाण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, बेंबळा धरण व खारवगळ नाल्याच्या पाणीप्रवाहाचा तांत्रिक अभ्यास करून योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी तसेच पुलाच्या प्रलंबित प्रस्तावाची सद्यस्थिती शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात कळवावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या एका आठवड्यात पुलाच्या कामाबाबत ठोस निर्णय घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास सात सप्टेंबरपासून खारवगळ नाल्याजवळ बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

निवेदन देताना उपसरपंच अनिल वानखडे, शेतकरी संजय गिरूळकर, शेख अंबीर शेख मुनीर, सुरेंद्र काकडे, आशिष बेंद्रे, राजू घुगरे, विजय मेश्राम, अशोक देशमुख, अमोल देशमुख, मनोहर उके, विजय मलोडे, लखपती मेश्राम, मारोती मेश्राम, अमोल बेंद्रे, प्रवीण धांदे, पांडुरंग भोयर, जनार्दन शेंडे, मनोज ढोके, विनय गोटेफोडे, मेहबूब खॉं पठाण, अनंत भोयर, हरिश्याम कडू, ईश्वर भोयर, मधुकर शेंडे, सुरेश सहारे, अनिल सहारे, अतुल जवंजाळ, सुनील चनेकार, संजय मेश्राम, अश्विनी तुपट, अमर बनकर, अरुण परसोडकर, संजय काकडे, बाबूराव काकडे, नीतेश बनकर, मोरेश्वर चनेकार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande