
पाच पथकांची एकाचवेळी कारवाई; कोरे धनादेश, स्टॅम्प व संशयास्पद दस्तऐवज जप्त
अमरावती, ३ सप्टेंबर (हिं.स.)। दर्यापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर सावकारी व्यवसायाविरोधात सहकार विभागाने धडक कारवाई केली. जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पाच पथकांनी एकाचवेळी पाच ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत तीन ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, इसार चिठ्ठ्या, खरेदीखत तसेच डायरीचा समावेश आहे.
दर्यापूर येथील सहायक निबंधक कार्यालयाकडे गेल्या काही दिवसांत बेकायदेशीर सावकारीसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे सहकार विभागाने ही कारवाई केली. सकाळी १०.२० वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी १ वाजेपर्यंत सुरू होती.
सिव्हिल लाईनमध्ये १० दस्तऐवज जप्त
सिव्हिल लाईन परिसरात तिवसा येथील सहायक निबंधक प्रीती धामणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका महिलेच्या घरी धाड टाकली. यावेळी १० संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले. त्यामध्ये कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प तसेच स्थावर मालमत्तेच्या खरेदीखताचा समावेश आहे.
मोर्शी येथील सहायक निबंधक स्वाती गुडधे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुसऱ्या एका महिलेच्या घराची झडती घेतली. या कारवाईत सात संशयास्पद कागदपत्रे मिळून आली. त्यामध्ये कोरे धनादेश, इसार चिठ्ठी आणि खरेदीखताचा समावेश असून, ही कागदपत्रे सील करण्यात आली आहेत.
गजानन कॉलनीत १२ कागदपत्रे आढळली
गजानन कॉलनी परिसरात नांदगाव खंडेश्वरचे सहायक निबंधक सचिन पतंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. यावेळी १२ संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले. यामध्ये डायरी, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प आणि खरेदीखतांचा समावेश आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी