अमरावतीच्या रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. अनिल बोंडे आक्रमक
प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची रेल्वे प्रशासनाकडे मागणी अतिरिक्त रेल्वे सेवांसह शकुंतला एक्स्प्रेसच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा उपस्थित अमरावती, ३ सप्टेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वेच्या वतीने नागपूर येथे आयोजित विदर्भातील खासदारांच्या मह
मध्य रेल्वेच्या खासदार बैठकीत डॉ. अनिल बोंडे आक्रमक; अमरावतीच्या रेल्वे प्रश्नांवर ठोस कार्यवाहीची मागणी


प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

अतिरिक्त रेल्वे सेवांसह शकुंतला एक्स्प्रेसच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा उपस्थित

अमरावती, ३ सप्टेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वेच्या वतीने नागपूर येथे आयोजित विदर्भातील खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आक्रमकपणे आवाज उठविला. रेल्वे विकासाची कामे केवळ कागदावर न राहता ती निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच विदर्भातील खासदार उपस्थित होते. यावेळी विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि प्रवाशांच्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

डॉ. बोंडे यांनी अमरावती जिल्ह्यातील रेल्वे अंडर ब्रिज आणि रेल्वे ओव्हर ब्रिजच्या बांधकामाचा दर्जा तसेच या कामांमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. राजकमल चौकातील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामाला गती देण्याची मागणीही त्यांनी केली.

शकुंतला एक्स्प्रेसच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा

शकुंतला एक्स्प्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बोंडे यांनी केली. तसेच अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन परिसरातील जुन्या हेरिटेज वास्तू पाडण्याचे काम थांबवून या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ग्रामपंचायत बारगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रेल्वे मार्गाला समांतर रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय अमरावतीतील आरएलडीएच्या सुरू असलेल्या कामांमुळे निर्माण होत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अतिरिक्त रेल्वे सेवांची मागणी

अमरावती–मुंबई अंबा एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सुरू करावी, पुणे–शेगाव वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा अमरावतीपर्यंत वाढवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. वाढत्या प्रवासी गरजा लक्षात घेऊन अमरावती–मुंबई, अमरावती–दिल्ली आणि अमरावती–पुणे मार्गावर अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही डॉ. बोंडे यांनी केली.

बडनेरा रेल्वे स्थानकावरील स्वच्छता व्यवस्था सुधारण्याबरोबरच चांगापूर येथील दुहेरी अंडरपास आणि राजुरा बाजार, सुरळी तसेच उतखेड येथील प्रलंबित उड्डाणपुलांच्या बांधकामाचा मुद्दाही त्यांनी बैठकीत उपस्थित केला.

अमरावती जिल्ह्यातील रेल्वे विकासकामांचा नियमित पाठपुरावा व्हावा आणि प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी दर महिन्याला मुंबई येथे आढावा बैठक घेण्यात यावी, अशी सूचनाही डॉ. अनिल बोंडे यांनी रेल्वे प्रशासनाला केली.

नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्या आणि प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य देत सर्व प्रलंबित रेल्वे विकासकामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशी ठाम भूमिका त्यांनी बैठकीत मांडली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande