
निर्यातवाढीसाठी मुक्त व्यापार करारांचा प्रभावी वापर करण्याचे उद्योगांना आवाहन
चालू वर्षात १ ट्रिलियन डॉलर निर्यातीचे लक्ष्य
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर : भारताच्या वाढत्या मुक्त व्यापार करारांच्या (एफटीए) जाळ्याचा प्रभावी वापर करून देशातील उद्योगांना, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अधिकाधिक निर्यात संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रित, सर्वसमावेशक आणि देशव्यापी प्रयत्नांची गरज असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी सांगितले.
नवी दिल्ली येथे आयोजित ‘मुक्त व्यापार करारांचा लाभ : जनसंपर्क कार्यक्रम’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना गोयल यांनी भारताच्या विस्तारत असलेल्या एफटीए नेटवर्कचे ठोस निर्यात संधींमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकार, राज्ये, केंद्रशासित प्रदेश, निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि उद्योग संघटनांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत केंद्र सरकारसह विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी, निर्यात प्रोत्साहन परिषदांचे प्रतिनिधी आणि उद्योग संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. विशेषतः एमएसएमई आणि प्रथमच निर्यात करणाऱ्या उद्योजकांना एफटीएचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
भारताने आपल्या योगदानासाठी जगभरात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित अर्थव्यवस्था म्हणून ओळख निर्माण करावी तसेच जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थान मजबूत करावे, असे गोयल यांनी सांगितले. या विश्वासाचे आर्थिक मूल्यामध्ये रूपांतर होणे आवश्यक असून, २०४७ पर्यंत भारताला ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टात आंतरराष्ट्रीय व्यापाराची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करताना गोयल यांनी स्थिर किमतींवर आधारित चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ७.८ टक्के जीडीपी वाढीचा उल्लेख केला. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात भारताने साधलेली ही वाढ उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करून देशाच्या आर्थिक क्षमतेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
भारताच्या एफटीए नेटवर्कबाबत माहिती देताना गोयल यांनी सांगितले की, सुमारे ६० ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्थव्यवस्थांशी संबंधित नऊ एफटीएमुळे भारताला जागतिक व्यापाराच्या जवळपास दोन-तृतीयांश भागामध्ये प्राधान्यपूर्ण प्रवेश मिळू शकतो.
याशिवाय कॅनडा, मेक्सिको, चिली, मर्कोसुर, सॅकू, जीसीसी आणि इस्रायल यांसह विविध देश व व्यापारगटांशी भारताचे प्रस्तावित करार, तसेच आसियान, दक्षिण कोरिया आणि जपानसोबत एफटीएच्या पुनरावलोकनाचे प्रयत्न यामुळे भारताला जागतिक व्यापाराच्या सुमारे ७५ टक्के बाजारपेठेत स्पर्धक देशांच्या तुलनेत अधिक अनुकूल दराने प्रवेश मिळवण्याची संधी निर्माण होईल, असे गोयल यांनी सांगितले.
आधीच कार्यान्वित असलेल्या तसेच लवकरच लागू होणाऱ्या व्यापार करारांचा उल्लेख करताना त्यांनी चालू वर्षासाठी महत्त्वाकांक्षी निर्यात उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. भारत-यूके मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून कार्यान्वित झाला आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे