अमरावती : अंजनगाव बारी मार्गावर लुटमारीच्या घटनांनी खळबळ; पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
अमरावती, 03 सप्टेंबर (हिं.स.)। बडनेरा-अंजनगाव बारी मार्गावर गेल्या काही दिवसांपासून लुटमार, मारहाण व वाहन चालकांना अडविण्याच्या घटनांमध्ये बाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडलेल्या घटनांमुळे या मार्गावरील कायदा व सुव्
अंजनगाव बारी मार्गावर लुटमारीच्या घटनांनी खळबळ


अमरावती, 03 सप्टेंबर (हिं.स.)। बडनेरा-अंजनगाव बारी मार्गावर गेल्या काही दिवसांपासून लुटमार, मारहाण व वाहन चालकांना अडविण्याच्या घटनांमध्ये बाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडलेल्या घटनांमुळे या मार्गावरील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान २५ ऑगस्ट रोजी बगिया टी-पॉईंटजवळ एका तरुणाला अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन मोबाईल व दुचाकी जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी पुन्हा एका युवकाची गाडी तीन अनोळखी युवकांनी अडवून वाहनाची चावी हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकासोबत हाणामारी करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, मागून काही वाहन चालक येत असल्याचे लक्षात येताच संशयित चावी घेऊन पसार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, टिमटाळा रोडलगत कळंबे विट भट्टीजवळ एका युवकाला सहा जणांनी मारहाण केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. संबंधित युवकाने कसाबसा तेथून पळ काढून आपला जीव वाचविल्याचे सांगण्यात येत आहे. हे सहा जण मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी दारूच्या बाटल्या फोडल्याची माहिती मिळाली आहे.बडनेरा-अंजनगाव बारी या ग्रामीण मार्गावर दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी व प्रवासी ये-जा करतात. रायसोनी विद्यापीठ ते अंजनगाव बारी दरम्यानचा सुमारे दोन किलोमीटरचा वनविभागाचा अरुंद रस्ता, रात्रीचा अंधार आणि प्रकाशयोजनेचा अभाव यामुळे हा परिसर असुरक्षित बनला आहे. वन्यप्राण्यांचा धोका असतानाच आता लुटमार करणाऱ्या समाजकंटकांचीही भीती नागरिकांना सतावत आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?' असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, पोलिस आयुक्तांनी या गंभीर। प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande