
परभणी, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
देवस्थान इनाम वर्ग ३ क आणि ३ ब जमिनींच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करून इनामदार शेतकरी व संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी देवस्थान इनाम जमीन कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.निवेदनात जोगळेकर मॅन्युअल पॅराग्राफ ५१ च्या अनुषंगाने देवस्थान इनाम जमिनींच्या हक्कांबाबतही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. जुन्या इनाम जमिनींबाबत शासनाने केलेल्या विविध कार्यवाहीमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करून मूळ इनामधारकांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात, अशी मागणी समितीने केली आहे. देवस्थान, मंदिर व देवस्थान इनाम जमिनी हा विषय परस्परांशी संबंधित असल्याने त्यासाठी योग्य कायदेशीर व प्रशासकीय पद्धत निश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच आतापर्यंत शासनाने काढलेल्या विविध अध्यादेशांची आणि कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. इनामधारकांची नावे मूळ हक्कात नोंदवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी पात्र करावे, अशीही महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये इनामधारकांच्या नावावर वारस नोंद किंवा विरासत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करून, ही प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात कायदेशीर पद्धतीने राबवावी, असे समितीने म्हटले आहे. अल्पसंख्याक समाजातील देवस्थान इनामधारक व त्यांच्या वारसांना धार्मिक सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक संरक्षण मिळावे, तसेच त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.या निवेदनावर श्रीपाद पोहणकर, रामेश्वर पुरी, अवैधुत गिरी, गणेश दिक्षीत आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis