
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दशरथ रायकर असं या मराठा आंदोलकाचं नाव असून ते बीड जिल्ह्यातील संगम येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दशरथ रायकर हे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. रात्री उशिरा ते आंतरवाली येथील एका शेतात झोपले होते, मात्र ते सकाळी झोपेतून उठत नसल्याने त्यांना अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले असून आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis