जागतिक आव्हानांनंतरही भारताची 7.8 टक्के वाढ अप्रतिम : निर्मला सीतारमन
नवी दिल्ली, 03 सप्टेंबर (हि.स.) : जगभरातील आर्थिक आव्हाने आणि अडचणींच्या पार्श्वभूमीवरही भारताने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 7.8 टक्के विकासदर नोंदवला आहे. ही वाढ अप्रतिम असून, विविध आव्हानांनंतरही भारत जगातील सर्वाधिक वेग
निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री


नवी दिल्ली, 03 सप्टेंबर (हि.स.) : जगभरातील आर्थिक आव्हाने आणि अडचणींच्या पार्श्वभूमीवरही भारताने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 7.8 टक्के विकासदर नोंदवला आहे. ही वाढ अप्रतिम असून, विविध आव्हानांनंतरही भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले आहे.

अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टनुसार, निर्मला सीतारमन यांनी बुधवारी न्यूयॉर्कमध्ये बँक ऑफ अमेरिका आणि न्यूयॉर्कस्थित भारतीय वाणिज्य दूतावासाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उच्चस्तरीय व्यावसायिक गोलमेज बैठकीत गुंतवणूकदारांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर तसेच देशातील गुंतवणुकीच्या वाढत्या संधींवर प्रकाश टाकला.जगभरातील अडचणी आणि विविध आव्हानांनंतरही भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8 टक्क्यांचा अप्रतिम विकासदर नोंदवला आहे, असे सीतारमन यांनी गुंतवणूकदारांना सांगितले.

केंद्र सरकारने सातत्याने आर्थिक सुधारणांवर भर दिला असून, दिवाळखोरी व नादारी संहिता (आयबीसी) यांसारख्या सुधारणांमुळे नियामक स्थैर्य निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. या सुधारणांमुळे नियमांचे पालन करणे सुलभ झाले असून, कागदोपत्री प्रक्रिया कमी झाली आहे. दशकभरापूर्वी सत्तेवर आल्यानंतरपासून केंद्र सरकारचा हा प्रमुख उद्देश राहिला असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारने भांडवली मालमत्ता निर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर, विशेषतः विमान वाहतूक क्षेत्रावर, सातत्याने भर दिला आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सेंटरच्या विकासाला चालना देणे, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सना (जीसीसी) प्रोत्साहन देणे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्जाची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि बँकांच्या अनुत्पादित मालमत्तेत (एनपीए) घट करण्यावरही सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, असे सीतारमन यांनी सांगितले.या उपाययोजनांमुळे बँका आणि उद्योगांना विस्तार, विकास आणि मजबुतीसाठी अधिक अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड-19 साथरोगानंतर जागतिक अर्थव्यवस्थेसमोर सातत्याने आव्हाने निर्माण होत असतानाही भारत गेल्या अनेक वर्षांपासून वित्तीय शिस्त आणि आर्थिक विवेकाच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे, असेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.भारतामधील गुंतवणुकीच्या वातावरणात लक्षणीय सुधारणा झाली असून, केंद्र आणि राज्य सरकारे त्यांच्या-त्यांच्या पातळीवर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अधिक सक्रिय आणि स्पर्धात्मक भूमिका बजावत आहेत, असे सीतारमण यांनी नमूद केले. या सर्व प्रयत्नांचा संबंध ‘विकसित भारत 2047’ हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या व्यापक राष्ट्रीय अभियानाशी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी स्वागतपर भाषणात ३१ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या पहिल्या तिमाहीच्या जीडीपी आकडेवारीचा उल्लेख केला. ही आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेची मजबुती अधोरेखित करते, असे त्यांनी सांगितले. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार व गुंतवणुकीचे संबंध अधिक मजबूत करून दोन्ही देशांना भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यापूर्वी न्यूयॉर्कच्या पेन स्टेशनवर पोहोचल्यानंतर अमेरिकेतील भारताचे राजदूत व्ही. एम. क्वात्रा आणि कार्यवाहक महावाणिज्यदूत विशाल हर्ष यांनी निर्मला सीतारमन यांचे स्वागत केले.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande