गणेशोत्सवात लेझर बीम, डॉल्बी नको : अंनिस
अमरावती, 03 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवातील भक्ती आणि श्रद्धेला कर्णकर्कश डॉल्बीच्या दणदणाटाची किंवा लेझर बीमच्या झगमगाटाची गरज नाही. श्रद्धेचा संबंध भक्तीशी असतो, तर डॉल्बीचा संबंध उन्मादाशी आहे, अशी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने
गणेशोत्सवात लेझर बीम, डॉल्बी नको : 'अंनिस'


अमरावती, 03 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवातील भक्ती आणि श्रद्धेला कर्णकर्कश डॉल्बीच्या दणदणाटाची किंवा लेझर बीमच्या झगमगाटाची गरज नाही. श्रद्धेचा संबंध भक्तीशी असतो, तर डॉल्बीचा संबंध उन्मादाशी आहे, अशी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मांडली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी व लेझर बीमला फाटा देत पर्यावरणस्नेही आणि ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन समितीने केले आहे.

मानवी आरोग्यासह पशुपक्ष्यांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या मोठ्या आवाजाच्या डॉल्बीचा वापर पुन्हा वाढत असल्याचा दावा महा. अंनिसने केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवताना ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे आणि पर्यावरणाचे भान राखणे आवश्यक - असल्याचे समितीने म्हटले आहे. - डॉल्बीमुक्त महाराष्ट्रासाठी - नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्र अंनिसच्या वतीने सुरुवातीपासूनच विविध सण-उत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरे करण्यासाठी प्रबोधन आणि कृती कार्यक्रम राबवले जात आहेत. मी गणेशोत्सवात 'विसर्जित गणपती दान करा-निर्माल्य गोळा करा', दिवाळीत'फटाकेमुक्त दिवाळी', नवीन वर्षाच्या स्वागतावेळी फटाकेमुक्त उपक्रम, होळीनिमित्त 'होळीची पोळी गरजूंना द्या-होळी लहान करा', बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिर तसेच 'पर्यावरणस्नेही रंगपंचमी' असे विविध उपक्रम समितीने राबवले आहेत. सर्व जाती-धर्मांच्या सण-उत्सवांमध्ये पर्यावरणाचा विचार व्हावा, ही समितीची भूमिका आहे. सण साजरा करताना नागरिकांचे आरोग्य, पशुपक्ष्यांचे अस्तित्व आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी आणि लेझर बीमचा वापर टाळून पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्यासाठी महा. अंनिसच्या वतीने राज्यभर प्रबोधन करण्यात येत आहे. राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे डॉल्बीचा वापर वाढत असल्याचा आरोपही समितीने केला आहे. सर्वांना डॉल्बीला समाजातून हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी या अभियानाला साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन संजय बनसोडे, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अनिस महाराष्ट्रः गजेंद्र सुरकार, राज्य प्रधान सचिव; प्रफुल्ल मंदा श्रीधर यांच्यासह महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande