
नवी दिल्ली , 03 सप्टेंबर (हिं.स.)।भारत युरोपीय संघ (इयू) आणि युरोपसोबतचे आपले संबंध अधिक मजबूत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही भेट राजधानीतील हैदराबाद हाऊसमध्ये झाली. यापूर्वी पंतप्रधान डी वेव्हर यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधींना आदरांजली दिली. बेल्जियमच्या पंतप्रधानांनी राजघाट येथील अभ्यागत पुस्तिकेतही स्वाक्षरी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, भारत आणि बेल्जियममधील संबंध पारंपरिक सहकार्याच्या क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांपर्यंत विस्तारले आहेत. त्यांनी ‘जोरावर’ रणगाडा आणि आंध्र प्रदेशातील मोठ्या ग्रीन अमोनिया प्रकल्पातील सहकार्याचा उल्लेख केला.
बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्यासोबत संयुक्त निवेदन देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज आपल्या सहकार्याची व्याप्ती पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांपर्यंत पोहोचली आहे. आम्ही ‘जोरावर’ रणगाड्यासारख्या आधुनिक संरक्षण उपकरणांवर एकत्रितपणे काम करत आहोत. तसेच आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे जगातील सर्वात मोठ्या ग्रीन अमोनिया प्रकल्पांपैकी एका प्रकल्पाची उभारणी करत आहोत.”
दोन्ही देशांमधील संबंधांच्या ऐतिहासिक महत्त्वावरही त्यांनी भर दिला. ते म्हणाले, “भारत आणि बेल्जियमचे संबंध इतिहासात खोलवर रुजलेले आहेत. पहिल्या महायुद्धाच्या काळात बेल्जियममध्ये हजारो भारतीय सैनिकांनी दाखवलेले शौर्य आणि दिलेले बलिदान हा आपल्या सामायिक स्मृतींचा महत्त्वाचा भाग आहे. आज लोकशाही मूल्ये, बाजाराधारित अर्थव्यवस्था आणि नागरिकांमधील मजबूत संबंध यामुळे आपण नैसर्गिक भागीदार बनलो आहोत.”
भारत आणि युरोपीय संघादरम्यान झालेल्या मुक्त व्यापार कराराचे (FTA) कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘फास्ट-ट्रॅक यंत्रणा’ उभारली आहे.ते म्हणाले, “यावर्षीच्या सुरुवातीला भारत आणि युरोपीय संघादरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम करण्यात आला. जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही शक्तींमधील हे अभूतपूर्व सहकार्य जागतिक स्थैर्य, विकास आणि सामायिक समृद्धीला आणखी बळकटी देईल. भारताची सातत्यपूर्ण आर्थिक प्रगती आणि या करारामुळे आपल्या आर्थिक संबंधांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.
आज या संधींचे ठोस परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी आम्ही अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. ‘भारत-बेल्जियम बिझनेस फोरम’ला नियमित व्यवस्था बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दोन्ही देशांमधील वित्तीय, फिनटेक आणि नियामक संस्थांमधील समन्वय वाढवण्यात येईल. या उपाययोजनांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज आम्ही दोन्ही देशांतील स्टार्टअप्समधील संबंध अधिक मजबूत करण्यास आणि सागरी क्षेत्रातील क्षमता वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. विद्यापीठे आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्यही अधिक मजबूत केले जाईल. प्रतिभावान मनुष्यबळाची ये-जा सुलभ करण्यासाठी लवकरच ‘मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप अॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी केली जाईल.” “आज आम्ही प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही सविस्तर चर्चा केली. भारत आणि बेल्जियम हे दोन्ही देश कायद्याचे राज्य, संवाद आणि राजनैतिक मार्गांवर विश्वास ठेवतात,” असेही त्यांनी सांगितले.
बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर म्हणाले, “गेल्या 20 वर्षांतील बेल्जियमचे पहिले पंतप्रधान म्हणून भारतात उपस्थित राहणे माझ्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. हा खरोखरच खूप मोठा कालावधी आहे. या 20 वर्षांत भारतात मोठा बदल झाला आहे, विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली. आज भारत केवळ जगातील सर्वात मोठी लोकशाही नाही, तर सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्थाही आहे. भारत आर्थिक आणि तांत्रिक महासत्ता तसेच एक प्रमुख भूराजकीय शक्ती बनला आहे. त्याचा आवाज या प्रदेशाच्या पलीकडेही ऐकू येतो.”
ते पुढे म्हणाले, “बेल्जियमसाठी भारत हा महत्त्वाचा भागीदार बनत आहे. त्याचप्रमाणे माझा देशही भारताला बरेच काही देऊ शकतो, असा माझा विश्वास आहे. आमचा आकार तुलनेने लहान आहे, मात्र आम्ही जगातील सर्वाधिक खुल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहोत. व्यापार आणि जागतिक बाजारपेठांपर्यंतच्या पोहोचच्या बळावर आम्ही आमची समृद्धी निर्माण केली आहे.”“फार्मास्युटिकल्स, रसायने, सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमध्ये आम्ही जागतिक दर्जाचे कौशल्य विकसित केले आहे. ज्या सर्व विषयांवर आम्ही चर्चा केली, ते परस्पर सहकार्य आणि विकासाशी संबंधित आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून बार्ट डी वेव्हर 4 सप्टेंबरपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमधील परस्पर संबंध अधिक मजबूत करणे तसेच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांमधील सहकार्याचा विस्तार करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.भारत आणि बेल्जियममधील संबंधांना वेग येत असताना हा दौरा होत आहे. यापूर्वी मार्च 2025 मध्ये प्रिन्सेस अॅस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियमचे आर्थिक शिष्टमंडळ भारतात आले होते. या शिष्टमंडळात कंपन्या, वाणिज्य मंडळे, शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्थांमधील 338 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी 38 सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode