अमरावतीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत बैठक
अमरावती, ३ सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिसांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. पोलीस आयुक्त राकेश ओला
गणेशोत्सवासाठी पोलिसांचा 'अॅक्शन प्लॅन' पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या अध्यक्षतेत बैठक


अमरावती, ३ सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिसांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात शहरातील रस्त्यांवर पावसामुळे पाणी साचणे, खड्डे, वाहतुकीची कोंडी, विसर्जन मार्गावरील अडथळे तसेच सुरक्षा आणि स्वच्छतेच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी महापालिकेसह संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देशही देण्यात आले.

गणेश मंडळांनी रस्त्यावर अनधिकृतपणे मंडप उभारू नयेत, मूर्ती व मंडपाची उंची निर्धारित मर्यादेत ठेवावी आणि मंडप उभारण्यासाठी आवश्यक परवानग्या घ्याव्यात, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. मूर्ती व मंडपाच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवक नियुक्त करण्याचेही आवाहन करण्यात आले.

ध्वनिक्षेपकाचा वापर शासनाच्या नियमांनुसार करावा, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करावी तसेच धार्मिक भावना दुखावतील असे देखावे, फलक अथवा घोषणांचा वापर टाळावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील अनेक भागांमध्ये असलेली अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे आणि पाणी साचण्याची समस्या याबाबत सदस्यांनी माहिती दिली.

तसेच अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्या, वीजवाहिन्या व केबल्समुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. चित्रा चौक उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम, गणेश विसर्जन व मिरवणूक मार्गांवरील वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या, तसेच सुरक्षा आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली.

पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

गणेशोत्सवादरम्यान सोशल मीडियावर आक्षेपार्ह अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, संदेश किंवा मजकूर प्रसारित करू नये. अशा प्रकारची माहिती आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

शहरातील शांतता, जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्य कायम ठेवण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. आगामी दहीहंडी, गणेशोत्सव तसेच अन्य धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अमरावतीकरांना शुभेच्छाही दिल्या.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande