
परभणी, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणावरील अरुंद पुलावर रिसोडहून पंढरपूरकडे जाणार्या एसटी बसला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने बसमधील ४६ प्रवाशांचा जीव धोक्यात आला. बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.रिसोड ते पंढरपूर मार्गावर धावणारी एसटी बस क्र. एमएच १४ एमएच २३७७ येलदरी धरणावरील पुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने क्र. एमएच १७ बीवाय ०६४२ ने बसला जोरदार धडक दिली. धडकेमुळे काही काळ पुलावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. बसचालकाने प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या पुलावर यापूर्वीही विविध अपघात घडले असून, वारंवार होणार्या दुर्घटनांनंतरही पुलाच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. गुरुवारी घडलेल्या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशाच प्रकारची दुर्घटना अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी येलदरी पुलाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.येलदरी धरणावरील हा पूल विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणार्या महत्त्वाच्या मार्गाचा भाग आहे. अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल सध्या अरुंद आणि जीर्ण अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुलाची रुंदी कमी असल्याने समोरासमोर किंवा एकाच दिशेने जाणार्या वाहनांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. त्यातच या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis