
कोल्हापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
महावितरणकडून बसवण्यात येणार्या स्मार्ट मीटरच्या माहिती विश्लेषणातून कोल्हापूर शहरातील वीज ग्राहकाने केलेली वीज चोरी महावितरण पथकाने पकडली आहे. विशेष म्हणजे स्मार्ट मीटर माहितीच्या अहवाल विश्लेषणातून ही चोरी उघडकीस आली. या प्रकरणी संबंधित वीज ग्राहकाविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संबंधित वीज ग्राहकाकडून चोरीच्या विजेची किंमत व दंड असे एकूण ४५ हजार ४५० रुपये आकरण्यात आले आहेत.
कोल्हापूर शहराच्या संभाजीनगर परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी येथे स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून केलेली वीजचोरी महावितरणच्या संगणक प्रणालीवर निदर्शनास आली. महावितरण पथकाने तात्काळ केलेल्या तपासणीत मनिष रमेशलाल जसवाल या वीज ग्राहकाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या M12610243602 क्रमांकाच्या स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळले. या मीटरच्या अंतर्गत यंत्रणेत केलेल्या छेडछाडीमुळे प्रत्यक्ष वीज वापराच्या तुलनेत मीटरमध्ये 92 टक्के इतकी कमी वीज वापराची नोंद होत होती. संबंधित मीटरमध्ये १० जून ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला असल्याचेही स्मार्ट मीटर अहवालावरुन निदर्शनास आले.
तपासणी दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकाकडे विचारणा केली असता, मीटरमध्ये छेडछाड केल्याची कबुली दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कारवाईनंतर दोन पंचांच्या उपस्थितीत स्मार्ट मीटरचा पंचनामा करून मीटर सील करून पुढील तपासणीसाठी महावितरणच्या चाचणी विभागात जमा करण्यात आले. ग्राहकाने एकूण १,३६५ युनिट वीज चोरी केली असून याची दंडासह एकूण रक्कम ४५ हजार ४५० रुपये निश्चित करून वसूलण्यात आले आहेत. अधीक्षक अभियंता गणपत लटपटे व कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश चांदणे व कनिष्ठ अभियंता अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्मार्ट मीटरची स्मार्ट कार्यपद्धती – मुख्य अभियंता स्वप्नील काटकर
‘वीजचोर कितीही ‘स्मार्ट’ बनण्याचा प्रयत्न केला तरी स्मार्ट मीटरच्या उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तपासणीच्या शास्त्रोक्त पद्धतींमुळे मीटरमध्ये केलेली छेडछाड लपून राहत नाही. आता स्मार्ट मीटर अहवाल विश्लेषणातून विजचोरी पकडणे सहज शक्य आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी विजचोरी न करता आपली सामाजिक पत सांभाळत प्रामाणिक ग्राहक बनावे,’ असे आवाहन महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar