
नवी दिल्ली, 03 सप्टेंबर (हिं.स.) - 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) ही आता पूर्णपणे अरविंद केजरीवाल यांची पार्टी बनली आहे, असा गंभीर आरोप करत मनीष ब्रह्मभट्ट नावाच्या युवकाने गुरुवारी 'कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक' (CJP Democratic) स्थापनेची अधिकृत घोषणा केली. यावरून कॉकरोच जनता पार्टीमध्ये (CJP) मोठी फूट पडली असून मूळ आंदोलनाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. अभिजीत दीपके हे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचेही ब्रह्मभट्ट म्हणाले.
अहमदाबादचे रहिवासी असलेले मनीष ब्रह्मभट्ट यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीजेपी आंदोलनानंतर सर्व काही विकले गेले आणि ही केवळ 'टीम केजरीवाल' बनून राहिली आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच दिपकेने आपल्या टीममध्ये मित्र आणि मैत्रिणींचा भरणा केल्याचा आरोपही ब्रह्मभट्ट यांनी केला. अभिजीत दीपके यांच्यावर थेट निशाणा साधत मनीष ब्रह्मभट्ट म्हणाले, अभिजीत दीपके यांनी घर बसल्या 12 लोकांची टीम तयार केली. यासाठी कोणत्याही मूळ कार्यकर्त्याला किंवा आंदोलनाशी जोडलेल्या लोकांना बोलावण्यात आले नाही. या पदांसाठी काय निकष लावले गेले? त्यांनी आम आदमी पार्टीशी (AAP) जोडलेल्या आठ लोकांना, स्वतःच्या मैत्रिणींना आणि कॉलेजच्या मित्रांना यात जोडले आहे. आम्हाला प्रत्येक राज्यातून 5 प्रतिनिधी हवे होते, जेणेकरून कोणीही हुकूमशहा किंवा 'राजा' बनून निर्णय घेणार नाही. परंतु ही मागणी फेटाळून लावून मनमानी कारभार सुरू करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनीष ब्रह्मभट्ट माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिकची सुरुवात केली आहे. याचे कारण कॉकरोच जनता पार्टीच्या लोकांच्या रक्ताघामाने आंदोलन यशस्वी केले आहे. मात्र, यांनी केवळ आणि केवळ निवडक टीम बनवली आणि अरविंद केजरीवालची टीम बनवली आहे. ते पॉलिटिकल डील करु इच्छीत आहेत. ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या मुद्यांवर लढू इच्छीत नाहीत. केवळ केजरीवालच्या इशाऱ्यांवर भाजपाच्या विरोधी जे पक्ष आहेत, त्यांचे हे समर्थन करत आहेत. यांच्या टीममध्ये आठ लोक आम आदमी पार्टीचे आहेत. शिवसेना, समाजवादी पार्टी, टीएमसी, आरजेडीने समर्थन दिले आहे. यांच्या टीममध्ये कोणताही विद्यार्थी नाही.
आम्ही विद्यार्थ्यांची टीम ‘ए’ आहोत - अभिजित दीपके
दरम्यान ब्रह्मभट्ट यांच्या आरोपांवर अभिजीत दीपके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, कधी महाराष्ट्राचे सीए म्हणतात की, मी काँग्रेसची बी टीम आहे. काही लोक म्हणतात की, मी आम आदमीची बी टीम आहे. मला वाटते की या सर्व लोकांनी एकत्र बसावे आणि डिसाईड करावे की आम्ही कोणाचे कोण आहोत. आम्ही विद्यार्थ्यांची टीम ‘ए’ आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी