
लातूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद आणि जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शहरातील व्यापारी, नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील चौकात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्याला कायदेशीर वैधता द्यावी, तसेच मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पारंपरिक खेळांतून आंदोलनाची अनोखी पद्धत
रास्तारोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, आंदोलनकर्त्यांनी शांततेत आणि अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समाजबांधवांनी खो-खो, कबड्डी, सारीपाट आणि चिरगुडी यांसारखे पारंपरिक खेळ खेळत प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलनाच्या या अनोख्या पद्धतीमुळे परिसरात नागरिकांचे लक्ष वेधले गेले. पारंपरिक खेळांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीचा संदेश देण्यात आला.
व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकल मराठा समाजाच्या वतीने आदल्या दिवशीच व्यापाऱ्यांना बंदची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अहमदपूरचा हा प्रतिसाद मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजातील वाढता जनआक्रोश अधोरेखित करणारा ठरला. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis